Categories: Featured अर्थ/उद्योग कृषी

आजरा चंदगडच्या काजूला जीआय मिळण्याचा मार्ग सोपा; ‘या’ मंत्र्यानीच केल्या प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

कोल्हापूर | चंदगड व आजऱ्यातील काजूला जीआय मानांकन घेण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सुचना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी जीआय मानांकन आवश्यक असते. आजरा घनसाळ पाठोपाठ या विभागातील काजू हे दुसरे पिक आहे. पात्रता स्पर्धेत ते यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांच्या काजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी उपलब्ध होईल. 

काजू बीच्या दराचा प्रश्‍न गेल्या काही वर्षापासून गंभीर होत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील काजू प्रक्रिया उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्या पुढाकाराने दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत व्हीडीओ कॉन्फरन्स झाली. या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या काजू बीच्या दराबद्दलही मुद्दा उपस्थित केला. सध्या काजूला प्रतिकिलो १०० ते १०५ रूपये दर मिळतोय. परंतु हा दर परवडणारा नसल्याने हमीभावाने दर मिळणे गरजेचे असल्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.

घाटमाथ्यावरील काजू बीचे पृथ्थकरण करण्यात आले असून ती चवीला रुचकर आहे. कर्बोदकांचे प्रमाणही इथल्या काजू बी मध्ये अधिक आहे. त्यामुळे कोकणातील काजू पेक्षाही अधिक दर्जेदार आहे. परदेशातून येणाऱ्या काजूपेक्षा इथल्या काजूचा दर्जा अधिक वरचढ असून दीर्घकाळ टिकावू असल्याचे निदर्शनास आले आहे. उद्योगमंत्री देसाई यांनी या बाबींची गांभीर्याने दखल घेतली असून आजरा आणि चंदगड तालुक्‍यातील काजू साठी जीआय मानांकन मिळवण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Aajara Chandgad cashew nut Cashew nut cashew nut GI nomination