मुंबई। कोरोनामुळे पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. चिकन खाल्याने कोरोना होतो अशा अफवा पसरल्याने चिकन आणि अंड्यांची मागणी पूर्णत ठप्प झाली. त्यामुळे देशातील पोल्ट्री धारकांनी जिंवत कोंबड्या, पिल्ले आणि अंडी गाडून टाकली. काही ठिकाणी अंडी रस्त्याच्या कडेला फेकून दिली. मात्र अशा फेकून दिलेल्या अंड्यांतून आता नैसर्गिकरित्या चमत्कार झाला असून अंड्यातून चक्क पिल्ले बाहेर पडली आहेत. निसर्गाचा हा चमत्कार पाहून आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पाँडिचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरून ट्वीट केला आहे. या व्हीडीओत लाखो पिल्ली चिविचिवाट करत सगळीकडे पळताना दिसत आहेत. तर काही कावळे मात्र या पिल्लांना खाण्याचा प्रयत्नदेखील करत असताना दिसत आहेत. हे सगळं दृष्य पाहण्यासाठी गावकरी जमा झालेत. त्यापैकीच कुणीतरी हा व्हीडीओ शूट केला आहे. आता अनेक लोक या पिल्लांना आपल्या घरी नेत आहेत. मात्र पिल्लाची संख्या मोठी असल्याने उर्वरित पिल्लांच काय होणार याची चिंता सर्वांनाच लागून राहिली आहे.