Categories: बातम्या राजकीय

अखेर एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला…

मुंबई | भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, खडसेंनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर  स्वत:चं ट्विटर अकाऊंटही डिलीट केलं आहे.

नाथाभाऊ समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. एकनाथ खडसे उद्या समर्थकांसह मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ खडसे राजीनाम्याबाबत काय म्हणाले?
“मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या ४० वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” असं एकनाथ खडसे म्हणाले. 
काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून एकनाथ खडसेंच महाविकास आघाडीत स्वागत
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यावर एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती नाही. अधिकृतरित्या राजीनामा दिल्याचे कळल्यावर यावर प्रतिक्रिया देईन असे सांगितले आहे. 

Team Lokshahi News