Categories: Featured

गगनबावडा तालुक्यातील अणदूर धरणाला अतिक्रमणाचा विळखा? शासकीय यंत्रणा सुस्त!

धरणाच्या सुरक्षिततेबरोबर अस्तित्वच धोक्यात!

कोल्हापूर।४ जानेवारी। निसर्गाचं वरदान लाभलेल्या गगनबावडा तालुक्याला धनदांडग्यांची नजर लागली असून गगनबावडा तालुक्याच नैसर्गिक वरदान हिरावलं जाऊ लागलयं. याचा प्रत्यय गगनबावडा तालुक्यात एखादा फेरफटका मारला तरी आता पावलोपावली दिसत असून याला शासकीय विभागांचा लाभणारा वरदहस्त आणि हात ओले करून काम करण्याची वृत्ती कारणीभूत असल्याचे दिसून येतय. 

पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यपी आणि प्रेमीयुगलांना देखील आवर घालणे गरजेचे

प्रदुषणापासून दूर असणाऱ्या गगनबावडा तालुक्यातील अणदूर, कोदे यासारख्या धरणांवर बाहेरील धनदांडग्यांनी अतिक्रमण केले असून कोणतेही नियम न पाळता अगदी धरणाच्या पाण्यापर्यंत आपली फार्महाऊस उभारली आहेत. यामुळे पाणीसाठा प्रदुषित होण्याबरोबरच धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. यामध्ये काही स्थानिक देखील आघाडीवर असून त्यांनी थेट धरणाच्या काठावर सर्व नियम पायदळी तुडवून हॉटेल सुरू केले आहे.  जलसंपदा विभागाने यावर त्वरित कडक कारवाई करणे गरजेचे असून संबंधितांच्या तावडीतून अणदूर धरण वाचवणे गरजेचे आहे. 

गगनबावडा तालुक्यातील अणदूर धरणाची पाणीसाठवण क्षमता ५.७५ द.ल.घ.मी. इतकी आहे. हा पाणीसाठा सुरक्षित असल्याचे जलसंपदा विभागाकडून कागदोपत्री रंगवले जात असले तरी धरणाच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा प्रकार जलसंपदा विभागाला मात्र कसा काय दिसत नाही याचेच आश्चर्य तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे. धरणातील पाणीसाठ्यापासून ५०० मीटर अंतरापर्यंत कोणतीही खाजगी तसेच पर्यटनासाठी बांधकामे करता येत नाहीत, असे असताना ही बांधकामे कोणाच्या आशिर्वादाने केली आहेत असा प्रश्न यानिमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही.

गगनबावडा तालुक्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना सोईसुविधा पुरवण्यासाठी अनेक मुलभुत गोष्टींची गरज आहे. परंतु त्या उपलब्ध करून देताना अशा प्रकारे निसर्गाची हानी करणे योग्य नसल्याचे मत याठिकाणी येणाऱ्या पर्यटक आणि निसर्गप्रेमींकडून देखील व्यक्त केली जात आहे. दिवसेंदिवस याठिकाणी बांधकामांची संख्या वाढत असून अगदी धरणाच्या पाणीसाठ्यापर्यंत बांधकामे केली जात आहेत. याला जलसंपदा आणि महसूल विभागाने वेळीच आवर घालणे गरजेचे असून गगनबावड्यातील ही जलसंपदा आणि निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: गगनबावडा