karkam-poultry
करकंब।५ ऑक्टोबर। पंढरपूर म्हणटलं की सगळ्याच्या नजरेसमोर येते ती विठू माऊली. याच विठू माऊलीच्या नगरीतील करकंब गावच्या एका जिद्दी तरूणाने आत्मविश्वासाच्या जोरावर पोल्ट्री व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे. योगेश बोराडे असे या जिद्दी तरूणाचे नाव असून दीड हजार पक्ष्यांच्या युनीट पासून सुरू केलेला त्याचा व्यवसाय आता ५ हजार पक्ष्यांच्या युनीटपर्यंत पोहचलाय. परंतु हे करत असताना त्यासाठी करावी लागलेली मेहनत, वेळोवेळी आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करत योगेशने काढलेला मार्ग नक्कीच प्रेरणादायी आहे.
करकंब येथे योगेश बोराडे यांचे पाच हजार पक्षी क्षमतेचे दोन लेअर पोल्ट्री युनिट्स आहेत. गेल्या वर्षी दीड हजार क्षमतेचे कमी खर्चातले एक युनिट उभे केले. ते यशस्वी झाल्यानंतर, त्यातून आत्मविश्वास आल्यानंतर नवे साडेतीन हजाराचे युनिट त्यांनी उभारले आहे.
बाजारातील मंदीच्या काळात योगेश यांचे नियोजन – फेब्रुवारी २०१९ ते ऑगस्ट २०१९ या सात महिन्यांत एका अंड्याचा उत्पादन खर्च ४ रुपये तर फार्म गेट लिफ्टिंग रेट ३ रुपये अशी स्थिती होती. तथापि, योगेश यांनी स्वत: विक्री केल्यामुळे त्यांचा किरकोळ विक्रीचा सरासरी दर चार रुपयांवर आला आणि मंदीच्या आवर्तनातून धंदा सूरक्षित राखला गेला. आजघडीला बाजार उत्पादन खर्चाच्यावर आहे, पुढे हिवाळा आणि सुणासुदीमुळे खपात वाढ होईन नफ्यात आणखी सुधारणा अपेक्षित आहे.
साडेतीन हजार पक्ष्यांच्या नवीन बॅचचे उत्पादन – साडेतीन हजाराच्या विस्तारीत बॅचचे उत्पादन दिवाळीपासून सुरू होईल. पुढे, बाजारभाव किफायती राहण्याचे चिन्हे आहेत. शिवाय, मक्याच्या वाढत्या उपलब्धतेमुळे आताचा उत्पादन खर्चही कमी होईल. म्हणजे दुहेरी फायदा होण्याची शाश्वती आहे. मंदी च्या काळात शेडचे काम सुरू केले आणि अंड्याचे उत्पादन तेजी सुरू झाल्यावर येतेय. त्यामुळे योग्य टायमिंग साधले गेले असून चार पैसे अधिक मिळण्याची खात्री आहे.
थेट स्थानिक मार्केट मध्ये अंड्याची विक्री – योगेश सांगतात, “लेअर फार्ममधील संपूर्ण अंड्यांचे थेट मार्केटिंग केले जाते. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर मागणीत मोठी वाढ झालीय. पंढरपूर शहरात अंडी-चिकनच्या दुकांनात थेट विक्री केली जाते.”
भांडवल उभारणी – योगेश यांनी लोकमंगल बॅंकेतून २० लाखाचे कर्ज काढले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ मिळालाय. कर्ज हप्ते सुरळीत आहेत. हप्ता भरल्यानंतर महामंडळाकडून तत्काळ व्याजाची रक्कम जमा होते. महामंडळाकडील कर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे. ही प्रक्रिया समजून घेतल्याने कुणाही एजंटची मदत घेण्याची गरज योगेश यांना पडलेली नाही.
पोल्ट्री व्यवसायातील इनोव्हेशन – पंधरा आठवड्याच्या पुलेट्स पक्ष्यासह जून्या प्रोजेक्ट्सचा प्रतिपक्षी उभारणी खर्च ४०० रूपये होता. ७० बाय २० असा १४०० चौरस फुटाचा पत्र्याचा शेड उभारला आहे. पक्षांची विष्ठा पडण्यासाठी त्यात दोन उभे चर मारून खड्डे करण्यात आले आहेत. शेड बांधकामाचा खर्च १ लाख २५ हजार रुपये आला आहे. दोन टायरच्या केजेससाठीचा खर्च प्रतिपक्षी १०५ रुपये आला असून अशापद्धतीने शेड व पिंजऱ्यांसाठी तीन लाख रुपये तर २०० रुपये प्रति पुलेट्स पक्षी या प्रमाणे ३ लाख रुपये प्रमाणे एकूण सुमारे ६ लाखात दीड हजार पक्षी क्षमतेचे लेयर युनिट्स उभे राहिले आहे. बहुतांशी पोल्ट्री उत्पादकांच्या वेगवेगळ्या नियोजानुसार हा खर्च ७०० रूपये येतो तोच खर्च योगेश यांनी ४०० रूपयांपर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे त्यांनी तयार केलेले हे मॉडेल पोल्ट्री व्यवसायासाठी उत्तम उदाहरण आहे. या किफायती मॉडेलचा आणखी एक फायदा म्हणजे चर पद्धतीमुळे माशांचाही त्रास होत नाही, आणि वासही येत नाही. योगेश यांनी आपल्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा पोल्ट्रीत अशापद्धतीने उपयोग केल्याने हे मॉडेल यशस्वी होण्यास मदत झाली आहे.
नव्या युनीटची उभारणी पोल्ट्री स्टॅन्डर्ड प्रमाणे – योगेश यांनी उभारलेल्या “नव्या साडे तीन हजार पक्षी क्षमतेच्या युनिट्सची प्रतिपक्षी कॉस्ट मात्र सातशे रुपये प्रतिपक्षी आहे. त्यामुळे ही रक्कम साधारण सुमारे २५ लाखात आहे. जूने युनिट्स हे केवळ उपजिवकेपुरते आणि शिकण्यासाठी उभारले होते. तर नव्या युनिट्समध्ये पक्षी क्षमता जास्त असल्याने त्याची उभारणी पोल्ट्री व्यवसायासाठी ठरलेल्या स्टॅन्डर्डप्रमाणे करण्यात आली आहे.”
योगेशना कुटूंबियांचा पाठिंबा – योगेशला पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी भाऊ वैभव बोराडे, वडील अरूण बोराडे, आई अलका बोराडे यांनी प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला आहे. या व्यवसायाची दिशाही त्यांना मोठ्या भावानेच दाखवली असून ते औद्योगिक प्लास्टिकनिर्मितीचे काम करतात. योगेशना पोल्ट्री व्यवसायात संपूर्ण कुटुंबाची मदत होत असल्याने पोल्ट्रीतील करिअरच्या प्रारंभालाच चांगली दिशा मिळाल्याचे योगेश सांगतो.
कमर्शिअल पोल्ट्री एक आर्ट आहे. एक एंटरप्राइज वर्क आहे. उद्यमशील, संवादपटू, कष्टाळू आणि आशावादी लोकच पोल्ट्रीत यशस्वी होतात.
आज, इथे एका सामान्य घरातल्या नव्याने पोल्ट्रीत उतरलेल्या तरूणाची प्रेरणादायी स्टोरी पोस्ट केलीय, ज्याने पुढील सर्व निकष पूर्ण करून दमदार सुरवात केली आहे.