Categories: आरोग्य सामाजिक

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘या’ तज्ञांची टास्क फोर्स स्थापन!

कोल्हापूर | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज जारी केलेत. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

टास्क फोर्समध्ये औषध वैद्यकीय शास्त्राचे (मेडिसीन) एम.डी. डॉ. एम.व्ही. बनसोडे, बधिरीकरणशास्त्राचे (ॲनेस्थेशीया) एम.डी. डॉ. उल्हास मिसाळ, छाती व क्षयरोगशास्त्राचे (चेस्ट अँड टीबी) एम.डी. डॉ. अनिता सैबन्नवार, सूक्ष्मजीवशास्त्राचे (मायक्रोबायोलॉजी) एम.डी. डॉ. स्मिता देशपांडे, रोगप्रतिबंधक व सामाजिक औधवैद्यकशास्त्राचे (पीएसएम) एम.डी. डॉ. सुदेश गंधम, ॲस्टर आधार हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन (खासगी वैद्यकीय व्यावसायिक) डॉ. अजय केणी, ॲपल सरस्वती हॉस्पिटलचे फिजिशियन व इन्टेन्सिविस्ट डॉ. गिरीश हिरेगौडर हे सदस्य असतील. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षक डॉ. तेजस्वीनी सांगरुळकर ह्या सदस्य सचिव आहेत.

या टास्क फोर्सच्या वतीने
1) कोव्हिड-19 या संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी नियमित बैठका घेऊन रुग्णालयास क्षेत्रीय भेटी देवून जिल्हा प्रशासनास विविध उपाययोजना सुचविणे
2) कोव्हिड-19 गंभिर व अतिगंभिर रुग्णांच्याबाबतीत रुग्ण व्यवस्थापन संहिता (Patient Management protocol) व औषधोपचार संहिता, शासनाकडील मार्गदर्शक सूचना व स्थानिक परिस्थिती विचारात घेवून तयार करणे व त्याची अंमलबजावणी कोव्हिड 19 रुग्णालयात करणे
3) कोव्हिड रुग्णालयात विशेषज्ञ डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ यांची आवश्यकता सुनिश्चित करणे व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्याची अंमलबजावणी करणे
4) कोव्हिड-19 गंभिर व अतिगंभिर रुग्णांची दैनंदिन (सकाळ, दुपार, संध्याकाळ) रुग्णालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख व वरिष्ठ विशेषज्ञामार्फत तपासणी करण्याबाबत कार्यपध्दती निश्चित करणे व त्याची अंमलबजावणी करणे
5) कोव्हिड-19 रुग्णांमधील मृत्यूदर कमी ठेवणे व रुग्णांचे योग्य व्यस्थापन करण्याबाबत वेळोवेळी रुग्णालयाची पाहणी करणे, कोव्हिड वॉर्डला भेट देणे, व्यवस्थापनात सुधारणा करणे, रुग्ण व्यवस्थापनात हलगर्जीपणा होत आहे असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे
6) रुग्णालय व रुग्ण व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घेणे. याबाबी प्राधान्यक्रमाणे केल्या जाणार आहेत.

जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठका दर 3 दिवसांनी किंवा आवश्यकतेप्रमाणे कमी कालावधीतही घेता येणार आहेत. समिती/टास्क फोर्सचा एक स्वतंत्र whats app group तयार करुन या ग्रुपमध्ये अध्यक्ष व सदस्यांनी केलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे अन्य डॉक्टर्स, विशेषज्ञांचाही समावेश केला जाईल, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

Team Lokshahi News