Categories: Featured राजकीय

ठाकरे पिता पुत्रांसह सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती?

मुंबई | निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दाखवल्याच्या कारणावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे, आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अडचणीं मध्ये वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT ला या तिघांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची तपासणी करण्यास सांगितले आहे.

माहिती अधिकारांतर्गत एका कार्यकर्त्यांकडून या तीन नेत्यांच्या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता आणि दायित्वाबद्दल चुकीची माहिती दिली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT ला निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने RTI कार्यकर्त्यांकडून प्राप्त झालेली कागदपत्रे सीबीडीटीला चौकशीसाठी पाठविली आहेत. आता सीबीडीटीच्या चौकशीची प्रतिक्षा आहे. जर या आरोपात तथ्य आढळल्यास सीबीडीटी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ ए अंतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल करू शकते. या कायद्यांतर्गत जास्तीत जास्त ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

जून महिन्यात निवडणूक आयोगाने निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. ज्या प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती आहे किंवा त्याबाबत तक्रारी आल्यास निवडणूक आयोग दखल घेईल असं ही आयोगाने म्हंटलं होतं. महाराष्ट्रातील या नेत्यांशिवाय निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याबद्दल गुजरातचे आमदार नाथाभाई ए. पटेल यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी या निर्णयाला निवडणूक आयोगाचा नित्याचा भाग असल्याचे म्हटले आहे. “आयकर प्राधिकरणासह प्रतिज्ञापत्रात दिलेली माहितीची तपासणी करणे ही नित्य प्रक्रिया आहे. निवडणूक आयोग आणि आयकर विभाग सामान्यपणे माहिती सामायिक करतात, त्यामुळे या प्रकरणात काही नवीन नाही” असे सांगितले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: aditya thackeray election commission NCP Shivsena Supriya Sule Uddhav Thackeray निवडणूक आयोग निवडणूक प्रतिज्ञापत्र