Categories: Featured कृषी

शेतकरी बंधूनो ‘या’ सोप्या पध्दतीने ओळखा खतांमधील भेसळ

पिकांच्या सुयोग्य वाढीसाठी युरिया, डीएपी यासारखी खते महत्वाची समजले जातात. पण राज्यात यंदा युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवल्याचे समोर आले. याबरोबरच इतर खतांचाही तुटवडा निर्माण झाला. एकीकडे खतांचा तुटवडा असला तरी दुसरीकडे बनावट खतांची विक्रीही जोमात होत असल्याचेही चित्र दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीसह पिकांचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे खतांमधील बनावटगिरी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्या काही टिप्स या लेखात आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

युरिया  –
युरियाचे दाणे हे सफेद चमकदार आणि समान आकाराचे असतात. युरियाचे दाणे पाण्यात टाकल्यानंतर ते पाण्यात विरघळतात आणि  हाताला पाणी थंड लागते, असे झाल्यास युरिया उत्कृष्ट दर्जाचा असल्याचे समजावे.  याबरोबरच युरियातील बनावटपणा ओळखायचा असेल तर युरियाचे काही दाणे गरम तव्यावर टाकावे, आच वाढवल्यानंतर हे दाणे पूर्णत नाहिसे झाल्यास हा असली युरिया आहे असे समजावे. न विरघळणारा भाग शिल्लक राहिल्यास यामध्ये भेसळ आहे हे समजावे. 
* तपास नळीत १ gm युरिया, ५ ते ६ थेंब सिल्व्हर नायट्रेट, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिसळुन ढवळल्यास द्रावण पांढरे झाल्यास भेसळ आहे.

डीएपी – 
योग्य दर्जाच्या विनाभेसळ डीएपी ओळखण्यासाठी  एक सोपी पद्धत आहे.  डिएपीचे काही दाणे हातात घेऊन तंबाखूला चूना लावून  मळतात तशापद्धतीने डीएपीचे दाणे चूना लावून मळावे. मळल्यानंतर जर त्याच्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणेही असह्य होत असेल तर हा असली डीएपी आहे हे समजावे. डीएपी मधील भेसळ ओळखण्याची आणखी एक सोपी पद्धत आहे, डीएपीचे काही दाणे कमी आचेवर तवा गरम करुन  त्यावर टाकावे. ते फुलून दुप्पट आकाराचे होतात आणि फुटतात जर दाणे फुटले तर समजावे की हा डीएपी असली  किंवा खरा आहे.
* १ gm DAP खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर, ०१ ml आम्ल मिसळून हलवा. संपुर्ण DAP विरघळला नाही तर भेसळ आहे.

म्युरेट ऑफ पोटॉश – 
पोटॅश खतातील भेसळ ओळखायची असेल तर काही दाण्यांवर पाणी टाकल्यानंतर जर दाणे एकमेकांना चिकटले तर त्यात काही तरी भेसळ असल्याचे समजावे. पोटॉश पाण्यात टाकल्यानंतर विरघळून जाते. त्यामुळे पाण्याच्या वरच्या भागात लाल रंग दिसत असतो. त्यामुळे पाण्यात जर ते पूर्णत विरघळले नाही तर समजावे की त्यात भेसळ आहे.
निळ्या ज्योतीवर धऱल्यास ज्योतीचा रंग निळा किंवा आहे तसा राहिल्यास ते शुध्द समजावे, अन्यथा ज्योतीला पिवळा रंग आल्यास त्यात भेसळ असल्याचे समजावे. 
* १ gm खत, १० ml पाणी तपासनळीत घेऊन हलवून पाहिल्यास बरेच कण तरंगत असतील तर भेसळ आहे. याशिवाय पेटत्या निखाऱ्यावर खत टाकल्यानंतर निखारा पिवळा झाल्यास भेसळ समजावी.

सिंगल सुपरफॉस्फेट – 
सिंगल सुपर फॉस्फेटच्या दाण्यांना स्पर्श केल्यास त्याचा ठणक, किंवा कठीणपणा जाणवतो. नखाने फोडण्याचा प्रयत्न केल्यास फुटत नाहीत, किंवा तव्यावर टाकून गरम केल्यास त्याचे आकारमानही बदलत नाही. असे असल्यास हे खत शुध्द असल्याचे समजावे. 
* १ gm खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिश्रण गाळून घ्या. नंतर त्यामध्ये १ थेंब (२%) डिस्टिल्ड अमोनिअम हैड्रोक्साइड आणि १ ml सिल्व्हर नायट्रेट मिसळले तर द्रावनास पिवळा रंग न आल्यास भेसळ समजावी.

झिंकसल्फेट – 
झिंक सल्फेट पाच मिली पाण्यामध्ये विरघळून नंतर फिल्टर पेपरने गाळून घ्यावे. या द्रावणात सौम्य सोडिअम हायड्रॉक्साईड (१%) चे आठ ते दहा थेंब टाकावेत. पांढरा साका तयार होतो. या साक्यामध्ये तीव्र सोडिअम हायड्रॉक्साईड (४०%) चे दहा ते बारा थेंब टाकल्यानंतर साका विरघळत असल्यास खत शुद्ध असते.

कॉपरसल्फेट – 
कॉपर सल्फेट शुभ्र निळ्या रंगाचे असते. याची शुद्धता तपासण्यासाठी परीक्षा नळीत एक ग्राम कॉपर सल्फेट पाच मिली पाण्यामध्ये विरघळवल्यास पारदर्शक निळ्या रंगाचे द्रावण तयार होते. द्रावण अपारदर्शक झाल्यास किवा परीक्षा नळीच्या तळाशी साक्याचा काही अंश आढळल्यास या खतामध्ये भेसळ असल्याचे मानावे.

फेरससल्फेट – 
शुद्धता तपासण्यासाठी एक ग्रॅम फेरस सल्फेट परीक्षा नळीमध्ये घेऊन, त्यात पाच मिली पाणी टाकून विरघळवून घ्यावे. त्यात एक मिली पोटॅशिअम फेरो सायनाईड (५%) टाकावे. त्यानंतर निळ्या रंगाचा साका तयार झाल्यास त्यात लोहाची उपलब्धता आहे असे समजावे.

Team Lokshahi News