Categories: कृषी बातम्या

शेतकरी बंधूंनो.. आता जागेवरच करा मातीपरिक्षण; ‘या’ मशिनमुळे अर्धा तासात कळणार अहवाल!

रायपूर | शेतीमध्ये माती परिक्षणानुसार खते आणि सूक्ष्मअन्नद्रव्यांचे नियोजन करणे सध्याच्या घडीला महत्वाचे झाले आहे. केंद्र सरकारने देखील देशभरात शेतकऱ्यांसाठी मृदा आरोग्य कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी माती परिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. परंतु या ठिकाणाहून माती परिक्षण अहवाल मिळण्यास ४ ते ५ दिवसांचा कालावधी लागतो. हेच काम आता अवघ्या अर्ध्या तासात होणार असून शेतकऱ्यांना माती परिक्षणाचा अहवाल तात्काळ उपलब्ध होणार आहे.

इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपूरच्या कृषी शास्त्रज्ञांनी यासाठी ‘पोर्टेबल माती परिक्षण किट’ तयार केले असून त्याचे पेटंटही घेतले आहे. याची किंमत ६ हजार असून, किट विकत घेणाऱ्या शेतकऱ्यांना २० ते २५ टक्के अनुदानही दिले जाणार आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना जागेवरच मातीपरिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम, जमीनीचा सामू आणि इतर घटकांची माहिती तात्काळ कळणार आहे.

हे माती परिक्षण किट कृषी शास्त्रज्ञ डॉ. एस. के. पाटील, डॉ. ललित श्रीवास्तव, डॉ. व्ही. एन. मिश्रा आणि डॉ. आर. ओ. दास यांनी विकसित केले आहे. याबाबत कृषी शास्त्रज्ञ डॉ. दास यांनी सांगितले की, इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे किट भविष्यात शेती क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण कामगिरी बजावेल, तसेच शेती क्षेत्रात विविध बदलही घडवून आणेल. यामुळे शेतकरी स्वावलंबी होऊन त्याला पीक निवडीपासून ते उत्पादनापर्यंत सर्व निर्णय स्वतः घेता येणे शक्य होईल.

सध्या माती परिक्षणाचा अहवाल येण्यासाठी साधारणपणे ४ ते ५ दिवसांचा कालावधी लागतो. या पोर्टेबल किट मुळे ही समस्या दूर होणार असून अवघ्या अर्धा तासात माती परिक्षण अहवाल उपलब्ध होणार आहे. या किट मध्ये मातीच्या आरोग्यासंदर्भात तक्ता असून यामध्ये माती, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम, विद्युत वहनता, जमिनीचा सामू याचे प्रमाण कळणार आहे. माती परिक्षणावेळी विहित प्रमाणात रासायनिक घटक मिसळल्याने मातीचा रंग बदलतो. तसेच कोणत्या खतांचा अभाव आहे हे या रंगावरून कळण्यास मदत होते.

stock image
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: soil health card soil health card app soil health card daily status soil health card parameters soil health card pdf soil health card sample soil health card scheme soil health card scheme pib माती आरोग्य कार्ड माती आरोग्य कार्ड दररोज स्थिती माती आरोग्य कार्ड नमुना माती आरोग्य कार्ड पीडीएफ माती आरोग्य कार्ड मापदंड माती आरोग्य कार्ड योजना माती आरोग्य कार्ड योजना पब