मुंबई | राज्य सरकारने सन २०२०-२१ सालाकरिता कृषि यांत्रिकीकरण अनुदान योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, यांत्रिकीकरणावर भर देणे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हे प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवली जात आहे. कृषि यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना लागणाऱ्या अनेक यंत्रांसाठी अनुदान दिले जाते.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रोलिक पलटी नांगर, कडबा कुट्टी, ऊस पाचट यंत्र, पॉवर टिलर, विडर मशीन, फवारणी यंत्र अशा विविध प्रकारच्या अवजारांसाठी ही योजना लागू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागतो. त्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे सोबत असावी लागतात.
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह जाणे आवश्यक आहे. सीएससी केंद्रावर या https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची पोच म्हणून मिळालेली पावती जपून ठेवावी. शेतकऱ्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशी असली तरी लक्षांकापेक्षा अधिक अर्ज आल्यास लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थी निवड केली जाते.