Categories: Featured

शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्जमाफ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

नागपूर।२१ डिसेंबर। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची कर्जमाफी होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “ज्या गोरगरिब शेतकऱ्याचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत आहे. त्या शेतकऱ्यांचं २ लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल. मी आज महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा करतो. ही योजना मार्चपासून लागू होईल. मधले दोन महिने सरकारला तयारीसाठी पाहिजे आहेत. ही संपूर्ण योजना पारदर्शक असेल. या योजनेतील पैसा थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जाईल. याला कोणत्याही अटी शर्तींचा अडथळा येणार नाही.”

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या हंगामाचे जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल ते कर्ज देखील पुनर्गठित करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांना कोठेही अडचण येणार नाही, याचंही वचन मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देतो, असंही ठाकरे यांनी नमूद केलं.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Farmer loan wavier महात्मा ज्योतिबा शेतकरी कर्जमुक्ती योजना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेतकरी कर्जमाफी