Categories: कृषी

शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी कधी आणि कुठे पहायला मिळणार… जाणून घ्या

मुंबई। महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा फायदा राज्यातील ३४ लाख शेतकऱ्यांना होणार असून, त्यांची नावानिशी यादी शासन जाहीर करणार आहे. या कर्जमाफी योजनेच्या स्वरूपाविषयी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. एकूण कर्जमाफी ही २९ हजार ७१२ कोटी रुपयांची असेल. (महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना)

३० सप्टेंबर, २०१९ पर्यंत दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांनी या लाभार्थींच्या याद्या तयार केल्या असून, त्या शासनाच्या वेबसाइटवर १५ फेब्रुवारीपासून अपलोड करण्यात येणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल आणि मे, २०२० पर्यंत ती पूर्ण करण्यात येईल. लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत पातळीवर देखील पहायला मिळतील असे सांगण्यात येत आहे.

कर्जमाफीच्या लाभार्थीसाठी जे निकष शासनाने निश्चित केले आहेत, त्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली, तर त्यासाठी संबंधित बँकेस जबाबदार धरण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी कुटुंब नव्हे, तर वैयक्तिक शेतकरी हा लाभार्थी असणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच चांगला निर्णय घेतला जाणार आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Farmer loan waiver Scheme