Categories: कृषी

शेतकरी बंधूनो.. औषध फवारणीतून होणारी विषबाधा टाळण्यासाठी अशी ‘घ्या’ काळजी

शेतकरी आपल्या पिकांचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक औषधाची फवारणी करतात. यातील बहुतेक कीटकनाशके किंवा औषधे ही विषारी ते अतिविषारी या गटात मोडतात. त्यामुळे ही कीटकनाशके फवारणी करताना व्यवस्थित काळजी घेतली नाही तरी विषबाधा होऊन ती जिवावर बेतू शकतात. हा प्रश्न मागील काही वर्षांपासून सातत्याने समोर येत असून यंदाही यवतमाळ जिल्ह्यातील ३६ शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गाच्या सुरक्षेचा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून कीटकनाशक फवारताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणे महत्वाचे बनले आहे. 

कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी

 • फवारणीसाठी वापरण्यात येणारा पंप हा गळका नसावा.
 • फवारणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य भरपूर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.
 • फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब काठीने ढवळावे.
 • शक्यतो उपाशीपोटी फवारणी करू नये.
 • फवारणी करताना हातावर तंबाखू मळल्याने किंवा विडी पिण्याने कीटकनाशक पोटात जाण्याचा जास्त धोका संभवतो.
 • फवारणीचे काम झाल्यानंतर हात स्वच्छ पाणी घेऊन साबणाने धुवावेत.
 • फवारणी करत असताना लहान मुले, पाळीव प्राणी यांचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
 • फवारणीसाठी वापरलेले साहित्य जसे स्प्रेयर पंप, ग्लोव्हस वगैरे साहित्य ज्या पाण्याने धुतले जाते, त्या पाण्यात कीटकनाशकांचे विषारी कण किंवा अवशेष मिसळतात. त्यामुळे असे पाणी जमिनीत टाकावे अथवा छोटा खड्डा करून त्यात ते ओतावे. विशेष म्हणजे हे साहित्य नदी, नाले अथवा विहीरीजवळ ओतू नये.
 • कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर व्यवस्थित नष्ट कराव्यात.
 • कीटकनाशक फवारणीचे काम जास्तीत जास्त सहा ते सात तासच करावे.
 • सर्वात महत्वाचे म्हणजे वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी, जेणेकरून किटकनाशकाचा फवारा अंगावर येणार नाही. वार्‍याच्या विरुद्ध दिशेने अजिबात फवारणी करू नये.
 • कीटकनाशक फवारणी केलेल्या क्षेत्राच्या आजूबाजूला गुरांना चरायला सोडू नये.
 • कमीत कमी आठ ते दहा दिवस त्या क्षेत्रातील बांधाचे गवत कापून जनावरांना चारा म्हणून खाऊ घालू नये.

जाणून घ्या किटकनाशकाच्या बाटलीवरील विविध रंगाचे अर्थ –
कीटकनाशकांच्या बाटलीवर विविध रंगांचे विशिष्ट चिन्ह असते. त्यातल्या लाल रंगाचे चिन्ह असलेले औषध जास्त विषारी असते. त्याखालोखाल पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. ते फवारणी करण्याअगोदर शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाहून घ्यावे व त्याप्रमाणे व्यवस्थित काळजी घ्यावी.

फवारणी करण्यासाठी बाजारात छोटे संरक्षण किट मिळते, त्याचा वापर करणे कधीही फायद्याचे ठरते. तोंडाला मास्क किंवा फवारणी हेल्मेट घालावे, हात पाय पूर्ण झाकले जातील असा पेहराव करावा. हातामध्ये ग्लोव्हस वापरावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मद्यपान करून कधीही फवारणी करू नये. याप्रकारची काळजी घेतल्यास नक्कीच सुरक्षितरित्या किटकनाशकांची फवारणी करणे शक्य आहे. 

विषबाधा झाल्यास आढळून येणारी लक्षणे – 

 1. अशक्तपणा येऊन चक्कर येते.
 2. अंगाला दरदरून घाम फुटतो
 3. डोळ्यांची जळजळ व्हायला सुरवात होते.
 4. तोंडातून लाळ गळू लागते, तोंडाची आग होते, उलट्या सुरू होतात, मळमळ, पोट दुखी यासारखी लक्षणे सुरू होतात.
 5. डोकेदुखी, स्नायू दुखी सुरू होते, धाप लागते, छातीत दुखते व खोकला लागतो
 6. लक्षणे तीव्र स्वरूपाची असल्यास कालांतराने व्यक्ती बेशुद्ध पडतो.

महत्वाचे –  विषबाधा झाल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार घ्यावेत, हयगय करून जीव धोक्यात घालू नये.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Agriculture Pesticides Best Pesticides Organic Pesticides pesticides Pesticides Pdf Syngenta Pesticides Product Catalog Types of Pesticides एग्रीकल्चर कीटनाशक कीटनाशक कीटनाशक pdf कीटनाशक के प्रकार कीटनाशक दवाइयां जैविक कीटकनाशक सबसे अच्छा कीटनाशक सिंजेन्टा कीटनाशकों उत्पाद सूची