Categories: Featured

पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना मिळणार ‘हा’ नवीन लाभ – जाणून घ्या याविषयी सविस्तर…

नवी दिल्ली। मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध लाभदायक योजना आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींचीही अमंलबजावणी मोदी सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली असून ‘प्रधानमंत्री किसान सन्मान’ योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोदी सरकार आता ‘किसान क्रेडिट कार्ड‘चा लाभ देणार आहे.

शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी बॅंका तसेच सावकरांवर अवलंबून रहावे लागणार नाही. तसेच बॅंकाच्या चकराही माराव्या लागणार नाहीत. शेतकरी बॅंकेत कर्ज मागण्यास गेल्यानंतर त्याना बॅंक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी वागणूक चांगली नसते. हे सरकारच्या ध्यानात आल्यानंतर ही उपाययोजना राबवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. सरकार आणि आरबीआयच्या वतीने निर्देश देऊनही बॅंक अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा देण्यासाठी खेडेगावात जात नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बहुतांशी शेतकरी सावकार आणि जमीनदारांच्या दुष्टचक्रात अडकत होते. त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे स्पष्ट दिसत होते. 

PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ३ खास लाभ
  1. वर्षाला ६ हजार रूपयांचा सन्मान निधी
  2. किसान क्रेडीट कार्ड (३ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज)
  3. सुरक्षा विमा (१२ रूपये आणि ३३० रूपयात २ लाखांचा अपघाती आणि जीवनविमा)

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहजरित्या शेतीसाठी पैशाची उपलब्धता होणार आहे. त्याचबरोबर अशा शेतकऱ्यांना विनातारण १ लाख ६० हजार रूपयापर्यंतचे कर्जही दिले जाणार आहे. केंद्रसरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यापूर्वी १ लाख रूपयापर्यंतचे कर्ज विनातारण दिले जात होते. आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डशी लिंक केले गेल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा पतपुरवठा मिळणे सहज सुलभ होणार आहे. तर एक लाख ६० हजाराहून अधिक कर्जासाठी शेतकर्‍याला फक्त एक फॉर्म व जमिनीची कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. मोठी गोष्ट म्हणजे कर्जाच्या व्याज दरावर तीन टक्के अनुदान देखील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

किसान क्रेडिट कार्डमध्ये शेतीशी संबंधित लोकांना तसेच पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनाशी संबंधित लोकांना देखील कर्जसुविधेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना पंतप्रधान किसान पोर्टलमार्फत किसान क्रेडिट कार्डशी जोडण्यासाठी एसएमएसद्वारे संदेशही पाठविण्यात येत आहेत. युध्दपातळीवर हे काम हाती घेण्यात आले असून येत्या पंधरा दिवसात पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डशी जोडले जाणार आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Agriculture Bank loan for farmer Business Finance business-finance news crop insurance crop loan Farmers health insurance insurance for farmer Kisan credit card Kisan Linked with Credit card National News news PM Kisan samman Yojna प्रधानमंत्री किसान सन्मान योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकरी कर्जमाफी योजना शेतकरी कर्जमुक्ती योजना