मुंबई। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात दिला जाईल अशी घोषणा केली. मात्र आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा न झाल्याने शेतकरीवर्गात नाराजीचा सूर आहे.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी १० एप्रिल रोजी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात १५ हजार ८४१ कोटी रूपये जमा केल्याचे सांगितले. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसेच आले नसल्याच्या तक्रारी आहेत. तर ज्या वेबसाईटवर याविषयीचा अधिकृत तपशील शेतकरी वर्गाला समजत होता, ती वेबसाईट देखील ओपन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत सध्यातरी गोंधळाचेच वातावरण पहायला मिळत आहे.
याबाबत शेतकरी वर्गाशी संपर्क साधला असता, कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने भात बियाणे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज आहे, परंतु पीएम किसानचे पैसेच जमा न झाल्याने अद्याप बियाणे खरेदीचे किंवा खरीप हंगामाचे नियोजन करताच आलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाल्यास ते पैसे निविष्ठा खरेदीसाठी उपयोगात आणता येतील.
औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील शेतकरी संतोष जाधव यांनी सांगितले की, सध्याच्या टाळेबंदीच्या काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हातात कुठलेही काम नाही. त्यांची जगण्यासाठी मोठी परवड सुरू आहे. किसान सन्मान योजनेतील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडली तर तेवढाच घर चालवण्यासाठी हातभार लागला असता. वरुड काझी येथील शेतकरी योगेश दांडगे म्हणाले की, रक्कम जमा झाल्याच्या संदेशाकडे आम्ही शेतकरी डोळे लावून बसलो आहोत.
काहींना मोबाईलवर संदेश आले आहेत. मात्र, बँक खात्यावर एक रूपयाही रक्कम जमा झालेली नाही. तर नाशिक जिल्ह्यातील योगेश पाटील या शेतकऱ्याने सांगितले की, गावात मजुरी करणाऱ्या गोरगरीब लोकांना मिळणारी रक्कम जनधन खात्यावर जमा झालेली आहे. मात्र, पीएम किसान योजनेची रक्कम आम्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. ही रक्कम कधी जमा होईल, याकडे आम्ही लक्ष लावून बसलो आहोत. या योजनेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्कही होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
एकूणच केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसानचे पैसे जमा झाल्याचे सांगितले जात असले तरी अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात हतबल झालेल्या शेतकरी वर्गाची चिंता आणखीनच वाढली आहे.