Categories: Featured

‘माझे पप्पा’ भावनिक निबंध लिहिणाऱ्या चिमुकल्याला धनंजय मुंडेंचा मदतीचा हात

बीड। मंगेश वाळके या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या ‘माझे पप्पा’ या हृदय पिळवटून टाकणाऱ्या निबंधाची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली आहे. मंगेशच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले असून त्याची आई अपंग आहे. त्यामुळे मंगेशच्या कुटूंबाला आता सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांग कल्याण निधीमधून अर्थसहाय्य मिळणार आहे. 

‘माझे पप्पा’; चौथीत शिकणाऱ्या मंगेशचा हृदय पिळवटून टाकणारा निबंध व्हायरल – ही आहे याविषयीची बातमी.. नक्की वाचा

बीड।कोवळ्या वयातच वडिलांची साथ सुटली, हट्ट पुरवणारा बाप काळाने हिराऊन नेला आणि अशातच वर्गात निबंधाचा विषय आला माझे वडील. त्यानंतर १० वर्षांच्या मंगेशने लिहलेला ‘माझे पप्पा’ हा निबंध वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्याचा हा निबंध सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. मंगेशने ‘माझे पप्पा’ या निबंधातून आपल्या घरातील आर्थिक विवंचना व घरातला कर्ता पुरुष नसल्यानं आलेली हलाखीची परिस्थिती स्पष्ट केली आहे. यातून त्याच्या कोवळ्या मनाच्या वेदना आणि नितळ भावना कागदावर उमटल्या आहेत.

मंगेश वाळके हा अवघ्या १० वर्षांचा मुलगा बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीत राहतो. तो चौथ्या इयत्तेत शिकत असून गेल्या महिन्यात (१८ डिसेंबर २०१९) त्याच्या वडिलांचे क्षयरोगाने (टीबी) निधन झाले. या धक्क्यातून मंगेशचं कुटुंब अजूनही सावरलेलं नाही. याचदरम्यान एके दिवशी शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘माझे वडील’ या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले. वडिलांच्या निधनानंतर संवेदनशील झालेल्या मंगेशने वडिलांविषयीच्या आपल्या भावना या निबंधातून मांडल्या असून त्याचा निबंध वाचून त्याच्या शिक्षिका भावनिक झाल्या, त्यानंतर त्यांनी मंगेशचा हा निबंध व्हाट्सअॅप ग्रुपवर शेअर केला आणि तो काहीवेळातच व्हायरला झाला आहे.

वडिलांचे टीबीमुळे निधन झाले आणि लहान वयातच मंगेश पोरका झाला. मंगेशने त्याच्या संवेदना निबंधाद्वारे वहीच्या पानावर उमटवल्या असून निबंध वाचताना वाचणाऱ्याच्या काळजालाही चिरा पडत आहेत. यानंतर मंगेशच्या घरच्या परिस्थितीची माहिती घेतली असता मंगेशची आई अपंग असल्याचे दिसून आले. त्यामुळे मंगेश घरकामात आईला मदत करण्याबरोबर शालेय शिक्षण देखील घेत आहे. मंगेशचे वडील परमेश्वर वाळके हेच या दोघांचे आधार होते. ते आज या जगात नाहीत, परंतु मंगेशने आपल्या वडिलांची भासणारी उणीव या निबंधातून माडली आहे. शालेय वयातच आपल्या परिस्थितीशी झगडणाऱ्या मंगेशच्या कुटूंबियाला यामुळे सध्या मदतीची खूप गरज आहे.

निबंध : माझे पप्पा

माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टिबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीने माला मामाच्या गावाला पाठविले होते. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. माला खाऊ आणायचे, वही, पेन आणायचे, माझा लाड करत होते. माला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा १८ डिसेंबेर ला वारले. माझी मम्मी खूप रडली, मी बी लई रडलो. तेव्हा आमच्या घरी पाव्हणे आले होते. माझे पप्पा खूप मायाळू होते. ते म्हणायचे मंगेश तू शिकून मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कोणीच कोणाला मदत करत नाही. त्यांनी एकदा खोल पाण्यातून मी आमच्या गाईला काढले. मला पप्पांची आठवण येते. रात्रीच्याला आम्हाला चोरांची भीती वाटते, पप्पा तुम्ही लवकर परत या…

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Beed beed guardian minister crop insurance death insurance policy Dhananjay Munde family insurance policy father essay get online insurance Insurance Mangesh walake Essay my father essay personal insurance