आई-वडील हे नातं प्रत्येकासाठी खूपचं स्पेशल असतं. आई घराचं मांगल्य, तर वडील अस्तित्व. त्यामुळे आपल्या आई वडिलांप्रती असलेल्या प्रेमाच्या सन्मानापोटी डे साजरे केले जातात. आईच्या सन्मानासाठी मदर्स डे, तर वडिलांच्या सन्मानासाठी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी जगभरातल्या विविध देशात Fathers Day साजरा केला जातो. हा दिवस यंदा आज २१ जून रोजी साजरा केला जात आहे.
सोनोरा स्मार्ट डोड हिने १९१० मध्ये साजरा केलेला फादर्स डे हा अधिकृतरित्या पहिला मानला जातो. सोनोरा स्मार्ट डोड लहान असताना तिच्या आईचे अचानक निधन झालं. त्यानंतर तिचा सांभाळ तिचे वडील विलियम स्मार्ट यांनी केला. एक दिवस डोड प्रार्थना सभेसाठी गेली असता चर्चमध्ये आई या विषयावर उपदेश देण्यात आला. त्याने डोड ही फार प्रभावित झाली.
मोठी झाल्यानंतर सोनोराला आईप्रमाणे वडिलांसाठीही एखादा खास दिवस असावा असे वाटू लागले. या विचारानेच तिने फादर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने तिच्या वडीलांच्या (विलियम स्मार्ट) जन्मदिनी म्हणजे ५ जूनला Father’s Day साजरा केला. वडिलांच्या सन्मानार्थ सोनेराने साजरा केलेल्या फादर्स डे या संकल्पनेला १९२४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती कैल्विन कोली यांनी अधिकृतरित्या मंजूरी दिली. यानंतर १९६६ मध्ये राष्ट्रपती लिंडन जॉनसन यांनी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाईल, अशी घोषणा केली.
मात्र ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. तर ब्राझीलमध्ये ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्यात येतो. सुरुवातीला केवळ अमेरिकेतच साजरा केला जाणारा फादर्स डे कालांतराने जगभरातील विविध देशात साजरा केला जाऊ लागला. भारतातही याचे महत्व पटल्यामुळे जूनच्या तिसऱ्या रविवारी Father’s Day साजरा केला जातो.
‘फादर्स डे’ च्या इतिहासाबाबत दोन वेगवेगळे दाखले दिले जातात. फादर्स डे हा १९०७ मध्ये व्हर्जिनियामध्ये सर्वप्रथम साजरा केला गेला असं म्हटलं जातं. व्हर्जिनियातील एका खाणीत झालेल्या स्फोटात २१० कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या मृतांना विशेष श्रद्धांजली वाहण्यासाठी १९ जून १९०७ रोजी फादर्स डे साजरा करण्यात आला. मात्र याबाबत कुठेही अधिकृत नोंद आढळत नाही.