Categories: ब्लॉग

छप्पन इंची नुसती तोंडातच हवा म्हणा की…

स्थळ : शहाणेवाडीचा पार..
प्रसंग दिवसभराचा कामधंदा आटोपून तोंडावर टाॅवेल चढवून (मास्क ऐवजी मोदी जसा गमछा वापरतात) शहाणेवाडीतील वयोवृद्ध मंडळी नेहमीप्रमाणे पारावर चकाट्या पिटायला जमा झालेली असतात.
संभाण्णा : व्हय रं किशादा? त्यो आटपाडकराचा नामा तालुक्याच्या इस्पितळात कोरोना हून मेला म्हणं?
दिनाआप्पा : (मध्येच तोडत) पर हे किती दिस चालायचं? पंतपरधानानं सांगिटल व्हतं, म्हाभारतातलं युद्ध आठरा दिस चाललं व्हतं, आपुण समदी मिळून कोरोनाला यकवीस दिवसात हारवु आन मंग ही माणसं कुंबडीच्या पिल्यागत पटाटा कशी मराय लागल्याती?
संभाण्णा : (दिनाआप्पाला उद्देशून) लगा, तु ताटल्या वाजीवल्यास नवं? घरात लायटा घालवून दिवं लावलंस नवं? मग पंतपरधानालाच इचार जा की ह्ये कवा थांबायचं?
ख्या ख्या ख्या (पारावर हशा पिकतो)
किशादा : संभाण्णा बरुबर बोलतुय, लोकसभच्या इलेक्शान मधी कमळाची टुपी घालून खासदाराला गावभर फिरवत हुता दिनाप्पा, मंग आता ह्यो प्रश्न त्या खासदारानं आधिवेशनात इच्चारला पाहिजे बघा.
संभाण्णा : (तोंडावरचा टाॅवेल बाजूला करुन पिवळीजर्द पिचकारी मारत) हांग्गास्स… पिचीक
दिनाआप्पा : प्रश्न इचाराय आमचा सायेब काय भित्तुय वी? पर आधिवेशनात प्रश्नोत्तराचा तासच काढून टाकलाय आन् मंग काय डोंबाल इचारणार हुई…
संभाण्णा : आन् मजी रं?
किशादा : मध्येच तोडत, लगानो तुमांनी माहिती हाय का? ही आधिवेशनात प्रश्न इचारायची पद्धत भारतात कशी सुरु झाली?
संभाण्णा, दिनाआप्पा : न्हायबा!
किशादा : लगांनो, भारतात ही पद्धत इंग्लंड देशातन घिटली इंग्लंडमधी १७२१ मधी त्येंच्या पार्लमेंटमधी प्रश्न उत्तराचा तास सुरु केला. मग फुढ भारतात कंपनी सरकारनं भारतातील संसदीय प्रश्न १८९२ च्या इंडियन काऊंसील ऑफ इंडिया कायद्याअंतर्गत असे प्रश्न सभागृहात इचारायची प्रथा पाडली. तरीबी स्वातंत्र्यापूर्वी भारतात प्रश्न इचारण्याच्या अधिकारावर निर्बंध हुतं. पण स्वातंत्र्यानंतर समद निर्बंध हाटीवलं आन् संसदेतील खासदार (सदस्य) लोकांसाठी महत्त्वाच्या अशा प्रश्नांची उत्तरे संबंधित मंत्र्यांना विचारु लागलं. मग आता मला सांगा मुदीसायेब पंतपरधान झाल्यापासन हिंदूराष्ट्र निर्माणाला सुरुवात झाली, राम मंदिराचा पाया भरुन हिंदू राष्ट्राची मेढ बी रवली का न्हाय?
संभाण्णा, दिनाआप्पा : व्हय रवली की…
किशादा : मग आता मला सांगा, हिंदूराष्ट्रात इंग्लंडच्या कायद्याने प्रश्न इचारण्याची गरजच काय? आर्थमंत्रीण बाई बी म्हणत्या देशातल्या महामारी म्हंजी ‘देवाची करणी हाय’. मंग घाला की आ* आता देवळात जाऊनशाण… ही ही ही
संभाण्णा : पर मर्दा मला कळतंय आसं, १९५२ पास्न सुरु झालेल्या आधिवेशनात आस कवासुदीक झाल्याल नाय. आस करणं मजी, खासदारांच्या हक्काची पायमल्ली न्हाय का?
किशादा : आर बाबा, ज्या माणूस पत्रकार परिषद घेत नाही. राफेल खरेदी माहीती देशाला धोका सांगून लपवतो, नोटबंदीचा हिशोब देत नाय, राज्याच्या वाट्याचं जीएसटीचं पैस देत न्हाई, पी एम केअर फंडाचा हिशोब देत न्हाय, उद्योगपतींची कर्ज राईट आॅफ केल्याची माहिती देत न्हाई, त्यो खासदारांच्या प्रश्नाला काय उत्तर देणार?
संभाण्णा : मजी छप्पन इंची नुसती तोंडातच हवा म्हणा की… खी खी खी
किशादा : ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
दिनाआप्पा : (एकदंरीत चर्चा अंगलट आल्याचे बघून काढता पाय घेण्याच्या तयारीत असतात इतक्यात समोरुन शेजारीण गौराक्का शेण लावून घराकडं चाललेली असतेय तिला उद्देशून) गौराक्का, तुझ्या शेणी लावून झाल्या आसतील तर तीवढी कलच्या बचत गटाच्या मिटींगची सह्य तिवढी करुन जा…येतो मंडळी!
किशादा : लगा तु बी छप्पन इंची गत काढता पाय घेतलास की… ख्या ख्या ख्या
(पारावर एकच हशा पिकतो आणि मंडळी पांगतात)

– तुषार गायकवाड (लेखक राजकीय विश्लेषक असून वरील व्यंगात्मक लेखन हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)

Tushar Gaikwad

Share
Published by
Tushar Gaikwad
Tags: ५६ इंच छाती Narendra Modi कोरोना नरेंद्र मोदी पारावरच्या गप्पा राजकारण राजकारणाचा फड राजकीय गप्पा संसदीय अधिवेशन