Categories: नोकरी शिक्षण/करिअर सामाजिक

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदे तात्काळ भरा; पात्रताधारकांचे करवीर तहसीलदारांना निवेदन

कोल्हापूर | विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये आणि विद्यापीठातील लक्षणीय रिक्त प्राध्यापक पदांची संख्या लक्षात घेऊन ती तात्काळ भरण्यात यावीत असे निवेदन सेट-नेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्यावतीने करवीरचे तहसीलदार शितल भामरे यांना देण्यात आले. 

राज्य शासनाने वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा खालावत चाललेला आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी, परीक्षा मुल्यामापनासाठी व इतर कामांसाठी महाविद्यालयामध्ये पूर्णवेळ प्राध्यापक उपलब्ध नाहीत. त्याचा उच्च शिक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. राज्यशासनाने घेतलेल्या या निर्णयाने राज्यातील सेट, नेट व पीएच.डी.पात्राताधारकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यामुळे पात्रताधारक मोठ्या मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत. राज्यशासनाने याची दखल घेऊन, प्राध्यापक पदांची तात्काळ भरती प्रक्रिया सुरु करणे आवश्यक आहे. 

सेट – नेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्यावतीने याबाबत “मिशन निवेदन” हा कार्यक्रम सुरु केला असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व  तहसीलदार यांना निवेदन देऊन शासनाचे लक्ष या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

समितीच्या प्रमुख मागण्या – 
१. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठातील सहायक प्राध्यापक पदांची १००% तात्काळ भरती करण्यात यावी.
२. प्रचलित तासिका तत्त्व धोरण बंद करावे अथवा १००% पदांची भरती होईपर्यंत तासिका तत्वावर नियुक्त केलेल्या प्राध्यापकांस “समान काम, समान वेतन” या तत्वानुसार वेतन देऊन त्यांची सेवा ग्राह्य धरण्यात यावी.
३. विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकारच्या निर्णयानुसार वरिष्ठ महाविद्यालये पद भरती प्रक्रियेसाठी २०० बिंदू नियमावलीची अंमलबजावणी करण्यात यावी. 

समितीच्या वतीने निवेदन देण्यासाठी डॉ. किशोर खिलारे, डॉ. करीम मुल्ला, डॉ. उज्ज्वला बिरजे, राहुल भास्कर, डॉ. मृणालिनी देसाई, डॉ. संपदा टिपकुर्ले, डॉ. नेहा वाडेकर, डॉ. संतोष भोसले इत्यादी हजर होते.

Team Lokshahi News