Categories: मनोरंजन

कोल्हापूरच्या ‘देशी’ लघुपटाला फिल्मफेअर पुरस्कार

कोल्हापूर। कोल्हापूरच्या मातीतील कलाकारांनी निर्माण केलेल्या ‘देशी’ लघुपटाला फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोल्हापुरातील स्थानिक कलावंतांसोबत नामांकित अभिनेत्री वीमा जामकर यांनी या लघुपटात प्रमुख भुमिका निभावली आहे. रविवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक पसंतीचा सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार या लघुपटाला प्रदान करण्यात आला. अभिनेत्री सोनम कपूर यांच्या हस्ते लेखक व दिग्दर्शक रोहित बापू कांबळे आणि निर्माता राजेंद्रकुमार मोरे यांनी स्विकारला.

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मुलीला शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा विषय ‘देशी’ लघुपटात मांडण्यात आला आहे. या लघुपटाची कथा मनाला स्पर्शून जाणारी असून, प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा सामाजिक संदेश यातून देण्यात आला आहे. या लघुपटाने पदार्पणातच सांगलीच्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात सात पारितोषिके मिळविली आहेत. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ प्रस्तुत या लघुपटात वीणा जामकर यांनी नायिकेची भूमिका केली असून, इतर सर्व कलाकार तसेच तंत्रज्ञ हे स्थानिक आहेत.

जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी फिल्म फेअर समितीचे सदस्य, दिग्दर्शक करण जोहर,  रेमो फर्नांडिस, फरआन अख्तर, आर. माधवन, अभिनेत्री करीना कपूर, विद्या बालन आदी उपस्थित होते. नेहा धुपिया हिने सूत्र संचालन केले.

‘देशी’ लघुपटाची टीम – 

  • चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ प्रस्तुत.
  • निर्मिती – राजेंद्रकुमार मोरे
  • लेखक, दिग्दर्शक – रोहित बापू कांबळे
  • कलाकार – वीणा जामकर, गार्गी मिलींद नाईक, सुधीर जोशी, स्वरा कुरणे, ईशान महालकरी, उमेश नेरकर, एन. डी. चौगले, अनुजा बकरे, मोहीनी बोंद्रे
  • सहा. दिग्दर्शक – विजय माळी,
  • आर्ट दिग्दर्शक – विकी बिडकर
  • छायांकन – जयदिप निगवेकर
  • पार्श्वसंगीत – डॉ. जयभीम शिंदे
  • संकलन – शेखर गुरव, मेकअप – प्राण चौगले, स्टील फोटोग्राफी – मयूर कांबळे
  • वेशभूषा – सुभाष कांबळे, केशभूषा – मोहिनी चव्हाण, प्रॉडक्शन मॉनेजर – भगवान कुरडे
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: deshi short film