पुणे।विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेचा पराभव का झाला याचे उत्तर आता खुद्द पंकजा मुंडे यांनीच दिले आहे. पंकजा मुंडे यांना त्यांच्या मुलाने निवडणुकीत का जिंकली नाहीस? असा प्रश्न विचारल्याचे सांगितले. यावर आपण अभ्यास केला, मात्र पेपर दुसऱ्यांनीच तपासल्याचं उत्तर दिल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय पदवी ग्रहण समारंभात बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्या मुलानं विचारलं, आई तु इतकी चांगली आहेस, मग तू जिंकली का नाही? मी सांगितलं जसा तुझा पेपर तु लिहितो म्हणून तुला सांगता येतं की मला इतके मार्क आहेत. आमच्याकडे मी अभ्यास करते, पेपर दुसरेच लिहित असतात. त्यामुळे असं होऊ शकतं. यानंतर मला लोकांनी विचारलं तुम्ही काय करता? मी सांगितलं एखाद्या पायाला फ्रॅक्चर झाली की माणूस कसा आराम करतो आणि त्याचे मित्र येऊन त्यावर सह्या करतात तसं माझं सध्या चाललं आहे. मी फ्रॅक्चर झाले आहे. करिअर थोडफार फ्रॅक्चर होऊ शकतं. ते फार जिव्हारी लावून घ्यायचं नसतं. तोही एक अनुभव असतो.”
मला या कार्यक्रमाला का बोलावलं याचा मी विचार केला. त्यावर मेरिटचं शिक्षण घेऊन देखील बेरोजगार असल्यास काय भावना असते हे मी समजून घेऊ शकेल म्हणून मला बोलावलं असेल असं वाटलं. मी २३ हजार गावांना पाणी पाजलं. मुलींचा जन्मदर वाढवण्यात योगदान दिलं. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन केल्या. ग्रामपंचायतींसाठी काम केलं. जलयुक्त शिवार केलं. सगळं चांगलं केलं. पण अखेर मी निवडणुकीत जिंकू शकले नाही. हा भाग माझा परिचय करुन देताना राहिला, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.