Categories: बातम्या

सीपीआरच्या ट्रॉमा केअर सेंटर मध्ये आग; एका रूग्णाचा मृत्यु झाल्याची भिती

कोल्हापूर | सीपीआरमधे कोरोनाचे रुग्ण असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर मध्ये आज पहाटे शॉटसर्किट झाल्याने आग लागली. या कक्षातील १५ रुग्णांना स्थलांतरीत करीत असताना गंभीर अवस्थेतील एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. व्हेंटिलेटर अभावी या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. तरी रुग्णालय प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हंटल्याप्रमाणे या कक्षातील १५ रुग्णांना वेळीच सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आले असून केवळ एका कर्मचाऱ्याचा हात भाजला आहे.

“आगीमुळे कोणाचा मृत्यू नाही, मात्र त्यानंतर उडालेल्या धावपळीमध्ये अनेक जण घाबरून गेले, त्यातून इतर वार्डात शिफ्ट करताना विजय कांबळे यांचा मृत्यू झाला आहे.” विनायक कांबळे या रूग्णाच्या मुलानेच यासंदर्भात माहिती दिली आहे. रूग्णालय प्रशासन मात्र कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगत आहे, तर सीपीआर परिसरात मात्र चार रूग्ण मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे.

सीपीआरमधील ट्रॉमाकेअर मधील एका कक्षात इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शाॅर्ट सर्किट झाल्याने पहाटे पावणेचारच्या सुमारास आग लागली. आग लागलेल्या वॉर्ड मध्ये गंभीर असलेले पंधरा रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर घटनास्थळी धाव घेत सुरक्षारक्षकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी फायर अक्सीग्युशनच्या सहाय्याने आग विझविण्यात यश मिळविले. यावेळी या कक्षातील १५ रुग्णांना पोलीस, कर्मचारी यांच्या साह्याने अन्य विभागात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या सगळ्या धावपळीत एका सुरक्षा रक्षकाचा हात भाजल्याने तो जखमी झाला, तर एक कर्मचारी धुराने गुदरमल्याने बेशुध्द पडला. या दोघांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आज अखेरीस १५० हून अधिक व्हेंटिलेटर सीपीआरमध्ये बसवण्यात आली आहेत. यातील काही व्हेंटिलेटर सदोष असल्याने कंपनीने ते दुरुस्त करून द्यावे यासाठी रुग्णालय प्रशासनाने पाठपुरावाही केला होता. मात्र यातील मोजकेच व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यात आले. एकूण रुग्णांचा वाढता ओघ आणि व्हेंटिलेटरचा वाढता वापर अशातच एका व्हेंटिलेटरने पेट घेतल्याने खळबळ माजली आहे.

Team Lokshahi News