मुंबई। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. गेले अनेक दिवस राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून सुरू असलेली पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी ठाकरे सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केला जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. येत्या २९ फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला असला तरी पाच दिवसातील कामाचे तास मात्र वाढवण्यात आले आहेत. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता दररोज ४५ मिनिटांचे वाढीव काम करावे लागेल. यानिर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दर शनिवार-रविवार हक्काची सुट्टी मिळणार आहे. सध्या प्रत्येक रविवारशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच कर्मचाऱ्यांना सुट्टी असते.
गेल्या अनेक वर्षांपासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी प्रलंबित होती. राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून ही मागणी केली जात आहे. पाच दिवसांचा आठवडा केल्याने दोन दिवस कार्यालये बंद राहतील. त्यामुळे वीज-पाणी आणि इंधन तसेच अतिरिक्त काम यावरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते, असं कर्मचारी संघटनांचं म्हणणं होतं.