कोल्हापूर | अंबपवाडी रस्त्यावरील अज्ञात व्यक्तिच्या खुनाचा छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसबा बावडा येथील पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी योगेश रविंद्र तांदळे (वय.23 ,टेंपो चालक), सुशांत जयवंत माने (वय.19,मातंग वसाहत), निखील रघुनाथ बिरंजे (वय.25,पिंजारगल्ली), दत्तात्रय हिंदुराव शिंदे (वय.46,जयभवानी गल्ली), शुभम सचिन कोळी (वय.22,चावडी जवळ,सर्व रा.क.बावडा) यांना ताब्यात घेतले असून आणखी काहीजणांना ताब्यात घेतले जाणार आहे. अंबपवाडी रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा हात पाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. घातपाताचा संशयाने पोलिसांनी तपास करत ही कारवाई केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, खुन झालेली व्यक्ती वेडसर असुन कसबा बावडा येथील नवनाथ मठ परिसरात रहाते. याव्यक्तीकडून वेडाच्या भरात काही वेळा नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार घडत होते. यातूनच काही दिवसांपूर्वी मंदिरात सेवेसाठी असणाऱ्या अंध सेवेकऱ्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही झाला होता. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे वरील संशयितांनी वेडसर व्यक्तीला गावाबाहेर सोडण्याचे ठरवले होते. या हेतूने वेडसर व्यक्तीस पकडण्यास गेले असता त्याने दगड,विटा फेकुन मारल्या. यामुळे या तरुणांनी त्याला मारहाण करुन, पकडुन, दोरीने बांधुन घातले. त्यानंतर त्याला अन्य ठिकाणी साेडण्यासाठी टेंपो मधून घेऊन पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नेले. व अंबपवाडी रोड येथे सोडुन हे सर्वजण परतले.
दरम्यान वेडसर व्यक्तीचा जखमी अवस्थेत मृत्यु झाला. ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. या नंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे या संशयितांचा माग काढला असता कसबा बावड्या तरूणांनी हे कृत्य केल्याचे दिसून आलेत.
याबाबत पुढील तपास वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, बाबासो दुकाणे, पोलिस नाईक दादा माने, संदीप गायकवाड ,योगेश राक्षे, रणवीर जाधव,शिरोली पोलिस ठाण्याचे सतिश जंगम, समीर मुल्ला, सुरज देसाई, कोल्हापुर शहर उपविभागीय कार्यालयातील गौरव चौगुले, अमर अडसुळे करीत आहेत.