बारामती | दूध दरवाढीविरोधात सरकारविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज (२७ ऑगस्ट) बारामतीत एल्गार पुकारला. यावेळी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका करताना, “आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधानं आंघोळ घाला”, असं शेतकऱ्यांना आवाहन केले. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्यासोबत जनावरेही आणली होती. बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय या मार्गावर हा मोर्चा निघाला. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्यासोबत जनावरेही आणली होती. यावेळी राजू शेट्टी पुढे म्हणाले की, आम्हाला जास्त जनावरं आणायची होती, पण पोलिसांनी अडवलं. आम्हाला अडवायचा पोलिसांना अधिकार आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली? याचा विचार करा. गाढविनीच दूध १ हजार रुपये लिटर किंमतीनं मिळतं. पण सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही?” असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.
“बाळासाहेब थोरातांच्या डेअरीत काय भाव आहे? याकडे बघा. उत्पादकाला २५ आणि वाहतुकीला २ रुपये मिळत आहेत. हे पैसे कुठे गेले? या सत्ताधाऱ्यांनी सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. सहा कोटी लिटर दुधाची खरेदी केली. त्यात दीडशे कोटी रुपये लुटले. मात्र भाववाढ झाली नाही. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. आधी सांगितलं मिळेल मात्र अजून मिळालेले नाही”, असं राजू शेट्टी म्हणाले.
“या लोकांनी दीडशे कोटींवर दरोडा टाकला, आता परत दोन महिने दरोडा टाकायची परवानगी दिली. तुम्ही आम्ही मावस भाऊ आणि सगळे मिळून वाटून खाऊ. अशी राज्यात परिस्थिती आहे. काही दूध संघ फक्त कागदावरचे, आणि सरकारला 17 ते 18 रुपयांनी विकले आहे, त्यात मंत्र्यांचा सहभाग”, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.