Categories: राजकीय

माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश; पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची वाढती ताकद

मुंबई | माजी आमदार राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा निवेदिता माने आणि त्यांचे पुत्र धैर्यशिल माने यांनी लोकसभेपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्याने हातकणंगले तालुक्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले होते. त्यांची जागा आजा राजीव आवळेंच्या रूपाने भरून निघणार आहे. राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगर परिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता आवळे, वडगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांनीदेखील प्रवेश केला आहे.

कोण आहेत राजीव आवळे?
इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ख्याती आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्यांनी पद काबीज केलं होतं. नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान असतानाच आवळेंनी वडगाव मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरुन कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. वडगाव हा काँग्रेसचा गड मानला जात होता. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचं 25 वर्ष एकहाती वर्चस्व असलेल्या बालेकिल्ल्याला राजीव आवळेंनी सुरुंग लावला होता.

राजीव आवळे 2004 मध्ये जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. कुंभोज मतदारसंघातून त्यांच्या पत्नी स्मिता आवळे या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. हातकणंगले मतदारसंघावर आवळेंचं वर्चस्व होतं. मात्र काही वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजीव आवळे यांचा गड खालसा केला होता. दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आवळे यांचं राजकीय पुनर्वसन कसं होणार, याकडे त्यांच्या समर्थकांचे डोळे लागले आहेत. मात्र हातकणंगले मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलण्याची ही नांदी मानली जात आहे.

Team Lokshahi News