Categories: Featured हवामान

निसर्ग चक्रीवादळात २ मृत्युमुखी, ४ जण जखमी, मालमत्तेचंही मोठं नुकसान!

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. अशातच वादळाचा फटका रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. खेड तालुक्यात वादळात घर उडाल्याने एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर अलिबागमध्ये विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू झाला.

रत्नागिरी। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. खेड तालुक्यात वादळात घर उडाल्याने एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर अलिबागमध्ये विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू झाला. तर यात ४ जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने, वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून नुकसानीबाबत २ दिवसांत भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वाऱ्याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढऱ्या समुद्रापर्यंत आली. ही नाव किनाऱ्याला आणली असून यावरील १३ खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आले आहे. हे खलाशी डिझेल पुरवठा करून परतण्यासाठी निघाले, परंतु वादळाच्या सुचनेमुळे थांबले होते. या प्रवाशांमध्ये १० भारतीय असून ३ परदेशी आहेत. यामुळे या सर्वांना क्वॉरंटाईन करून त्यांचे स्वँब घेतले जातील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले. हे जहाज खडकावर आदळून त्याला छिद्र पडल्याने वापरून झालेले इंजिन ऑइल सांडले, परंतु यामुळे कोणताही धोका नाही. बोट महिनाभर येथेच राहील, असंही ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली असल्याचंही सामंत यांनी सांगितलं आहे.

मुंबईच्या किनारपट्टीवर निसर्ग वादळ आदळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्याचे काम युध्दपातळीवर मुंबई पोलीस आणि महानगर पालिकेतर्फे करण्यात येत आहे. गीतानगरमधील ११ हजार लोकांना स्थलांतरित करण्याचं काम यावेळेस करण्यात आलं आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याला देखील हायअलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान पोहोचलेले आहेत. या चक्रीवादळाचा तडाखा ठाणे जिल्ह्याला बसल्यास कोणतीही आपत्ती उद्भवल्यास हे जवान तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावण्यासाठी सज्ज झालेले आहेत. या दलामध्ये ३० जवान आणि ३ अधिकारी यांचा सहभाग आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: cyclone in maharashtra Cyclone Nisarga cyclone nisarga updates Maharashtra maharashtra cyclone nisarga cyclone nisarga updates mumbai raigad ratnagiri thane mumbai cyclone update Ratnagiri uday samant