Categories: राजकीय

सांगलीचे चार ‘जावईबापू’ ठाकरे सरकारचे मंत्री, सांगलीकरांची कॉलर टाईट!

सांगली।३ जानेवारी।राज्याच्या मंत्रीमंडळात खातेवाटपावरून घमासान सुरू असल्याने सगळीकडे  याच चर्चा ऐकायला मिळत आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात वेगळ्याच चर्चेने जोर धरला असून ही चर्चा आहे जावई मंत्र्यांची. होय राज्याच्या मंत्रीमंडळात सध्या सांगली जिल्ह्यातील तब्बल चार जावई असल्याने त्यांचीच चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे दोघे, काँग्रेसचे एक, तर एक अपक्ष आमदार हे सांगलीचे जावई आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील हे जिल्ह्याचे सुपुत्र आणि जावई अशा दुहेरी भुमिकेत आहेत. याशिवाय, राष्ट्रवादीचेच मंत्री धनंजय मुंडे, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर असे अन्य तीन जावई मंत्रिमंडळात आहेत.

  • कॅबिनेट मंत्री जयंत पाटील हे मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावचे जावई आहेत. माजी आमदार स्वर्गीय मोहनराव शिंदे हे त्यांचे सासरे. ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांचे सुपुत्र असलेले जयंत पाटील शैलजा शिंदे यांच्याशी लग्न झाल्यानंतर सांगलीचे जावईही झालेत.
  • कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात हे वाळवा तालुक्‍यातील तांबवे गावचे जावई आहेत. राजारामबापू दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजीराव पाटील हे मंत्री थोरात यांचे मेहुणे आहेत.
  • राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे देखील सांगली जिल्ह्यातील बेडग (ता. मिरज) गावच्या खाडे घराण्याचे जावई आहेत.
  • अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून अनपेक्षितपणे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. ते वसगडे (ता. मिरज) गावातील जनगोंडा पाटील यांचे जावई आहेत.

राज्याच्या मंत्रीमंडळातील या चार जावईबापूंमुळे आता सांगली जिल्ह्याच्या चौका चौकात राजकीय गप्पांना चांगलाच जोर आलाय. त्यामुळे प्रत्येकाला आपलाच जावई मंत्री असल्याचा फील येत असून यामुळे सांगलीकरांची कॉलर मात्र भलतीच टाईट झाली आहे. 

Team Lokshahi News