Categories: सामाजिक

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे अनंतात विलीन, भाऊबीजे दिवशी भावाच्या पार्थिवाला ओवाळण्याची बहिणीवर वेळ

कोल्हापूर | शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर आज बहिरेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील असंख्य लोक जमा झाले होते. गावातील प्रत्येकाने आज त्यांच्या शौर्याला अखेरचा सलाम करत साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. फुलांचा वर्षाव करत नागरिकांनी जोंधळे यांच्या पार्थिवाला वंदन केलं. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या भ्याड हल्यात शुक्रवारी ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले. 

ऋषिकेश जोंधळे यांनी देशाच्या रक्षणासाठी अवघ्या २० व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली. त्यांच्या या शूरतेला वंदन करण्यासाठी पंचक्रोशीतील असंख्य लोकांनी गर्दी केली होती. पाकिस्तानने १३ नोव्हेंबर रोजी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारताच्या दिशेने बेछूट गोळीबार केला होता. यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, या गोळीबारात ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले.

अवघ्या 20 व्यावर्षी ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण
दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सैन्यात भरती झालेले ऋषिकेश जोंधळे भरती झाल्यापासून जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात ते तैनात होते. पाक सैन्याकडून शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) पहाटेपासून वारंवार शस्त्रीसंधीचे उल्लंघन केले जात होते. यावेळी पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दवाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झाले. जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

संपूर्ण गावावर शोककळा
ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आल्यानंतर त्यांचे पार्थिव गावी कधी येणार यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हावासिय वाट पाहत होते. अखेर आज ४ दिवसांनी त्यांचे पार्थिव लष्कराच्या फुलांनी सजवलेल्या वाहनातून गावी दाखल झाले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’ ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. यावेळी प्रत्येक उपस्थिताच्या डोळ्यात पाणी होते.

भाऊबीजे दिवशी भावाच्या पार्थिवाला ओवाळण्याची वेळ
बहीण भावाच्या नात्यातील स्नेह वाढवणारा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी भावाचे औक्षण करून त्याच्या दिर्घायुष्याची कामना सर्व बहिणी करतात. पण आज भाऊबीजेच्या दिवशीच शहिद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवाचे औक्षण करण्याची वेळ त्यांची बहिण कल्याणी जोंधळे हिच्यावर आली.

आई, वडील आणि बहिणीने फोडला टाहो 
ऋषिकेश जोंधळे यांचे पार्थिव घरासमोर नेले, तेव्हा त्यांच्या आई, वडील आणि बहिणीने फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले. त्यानंतर बहिरेवाडी हायस्कूलच्या पटांगणावर ऋषिकेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थितीत होते. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ऋषिकेश जोंधळे यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. ते ६ मराठा रेजिमेंटचे जवान होते. राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवल्यावर दोन वर्षापूर्वी ते भारतीय लष्करात भरती झाले होते. लॉकडाउन काळात १२० दिवस गावी राहिल्यानंतर ऋषीकेश जोंधळे हे ११ जून रोजी पुन्हा कामावर रुजू झाले होते. 

Team Lokshahi News