Categories: Featured आरोग्य

गगनबावडा तालुका कोरोनामुक्त, सर्व ६ रूग्ण परतले घरी

गगनबावडा। दुर्गम व डोंगराळ असणाऱ्या गगनबावडा तालुक्यात कोराना विषाणूने प्रवेश केल्याने तालुकावासियांच्यात भितीचे वातावरण पसरले होते. १३ मे रोजी पहिला कोरोना पेशंट तालुक्यात सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सलग आणखी ५ कोरोनाग्रस्त सापडल्याने तालुकावासियांच्यात भितीचे वातावरण होते. परंतु आता या सर्व पेशंटचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुकावासियांना दिलासा मिळाला आहे. 

कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार झाल्यानंतर अहवाल निगेटीव्ह आल्याने त्याना घरी सोडण्यात आले आहे. गगनबावडा तालूक्यातील अणदूर गावात मुंबईहून आलेल्या ३४ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला होता, त्यानंतर तिच्या बाळालाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. या दोघावंर कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. सदरची महिला १३ तारखेस आपल्या कुटूंबियासह आली होती. तिच्या सोबत एकूण पाच जण आले होते. कोल्हापूर येथे त्यांचा स्वॅब घेण्यात आल्यानंतर त्यांना अणदूर येथील शाळेत क्वारंटाईन करुन ठेवणेत आले होते. 

यानंतर ठाणे येथून आलेल्या तळये येथील रहिवाशी असलेल्या  २४ वर्षीय व २९ वर्षीय तरुणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. तर वेतवडे येथील दोघेजण कोरोना बाधित सापडले होते. त्यांच्या वर गगनबावडा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरु होते. तळये येथील दोन व वेतवडे येथील दोन तरुणावर गगनबावडा येथे तर अणदूर येथील महिला व तिच्या दोन महिन्याच्या बाळावर कोल्हापूर येथे उपचार  सुरु होते. या सर्वांचे दुस-या चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडणेत आले आहे. गगनबावडा तालूक्यातील हे सहाही कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी परतल्याने त्यांच्या व नातेवाईकांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत आहे.

Team Lokshahi News