Categories: आरोग्य

गगनबावड्यात कोरोनाचा ‘सहावा’ रूग्ण, तालुक्यात भितीचे वातावरण..!

जिल्ह्यात एकूण 278 पॉझीटिव्ह, शाहूवाडीत सर्वाधिक 89 – डॉ. बी. सी. केम्पी पाटील

गगनबावडा। तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आणखी एका तरूणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर तरूण ठाणे येथून आला असून सध्या गगनबावडा येथे क्वारंटाईन करण्यात आलेला आहे. बाधित रूग्ण हा तळये- लखमापूर येथील रहिवाशी असून त्याचे वय २४ वर्ष आहे. 

ठाणे येथून प्रवास करून आल्यानंतर हा तरूण १४ मे रोजी त्याच्या गावी न जाता थेट सीपीआर येथे स्वॅब देऊन क्वारंटाईन झाला होता. त्यानंतर त्याला १७ मे रोजी गगनबावडा येथील कोव्हिड केअर सेंटर येथे क्वारंटाईन केले आहे. त्याच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (२३ मे) सायंकाळी प्राप्त झाला असून सदर तरूणास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गगनबावडा तालुक्यातील हा सहावा कोरोनाबाधित असून यापूर्वी १ महिला, १ लहान मूल आणि ३ तरूण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आज सायंकाळी 5 वाजता 829 प्राप्त अहवालापैकी 17 अहवाल पॉझीटिव्ह आले तर 811 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 1 नाकारण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 278 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 89 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: gaganbawada corona update news