गगनबावडा तालुक्यात आज दोन कोरोनाबाधित सापडले

340

गगनबावडा | तालुक्यात गेल्या दोन दिवसात चार जण कोरोनाबाधित आढळल्याने दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील मांडुकली येथील ३९ वर्षाचा युवक व साखरी येथील ३५ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यात आज दोन रूग्णांची भर पडली आहे. यामध्ये गगनबावड्यातील ५९ वर्षीय पुरूष तर गारिवडे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

याबाबत तालुका प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी, गगनबावडा येथील कोरोना बाधित हा गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापुर येथेच आहे. लक्षणे जाणवल्यानंतर त्यांनी त्याचा स्वॅब सीपीआर कडे तपासणीसाठी दिला होता. तर गारिवडे येथील कोरोनाबाधित हा सध्या फुलेवाडी येथे वास्तव्यास आहे. दरम्यान या दोन्ही कोरोना बाधित व्यक्ती कोणा कोणाच्या संपर्कात आलेत याची माहिती घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. 

गगनबावडा तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सध्या जिल्ह्यात काही नियम अटी पाळून लॉकडाऊन सुरू असला तरी कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश येत नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक दिवशी २०० ते ३०० नव्या रूग्णाची भर पडत आहे.