Categories: Featured

गगनबावडा तालुक्यात आख्खी अंगणवाडीची इमारतच ‘गायब’; गावात उडाली खळबळ, मात्र प्रशासन सुस्तच..!

गगनबावडा। तालुक्यातील मणदूर येथील अंगणवाडीची इमारतच जागेवरून गायब झाली असून याबाबत प्रशासनाकडे गावकऱ्यांनी तक्रार देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सदर अंगणवाडीची इमारत विनापरवाना गावातीलच एका कंत्राटदाराने मनमानीपणे जमीनदोस्त केल्याचा आरोप आहे.

मणदूर येथील अंगणवाडीची इमारतच एका ठेकेदाराने विनापरवाना जमीनदोस्त केल्याने खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन परिस्थितीचा गैरफायदा घेत सदर ठेकेदाराने मनमानीपणे हे कृत्य केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शाळा कमिटीचे अध्यक्ष शिवाजी जोंधळेकर यांनी निवेदनाव्दारे गटविकास अधिकारी, गगनबावडा यांचेकडे केली आहे. अंगणवाडी इमारतीबरोबरच सदर कंत्राटदाराने प्राथमिक शाळेचे छत कोसळून टाकल्याचे म्हणटले आहे.  

निवेदनात म्हणटले आहे की, मणदूर ता. गगनबावडा येथे पहिले ते सातवी पर्यंतची जि. प. प्रा. शाळा असून या शाळेला लागून अंगणवाडीची इमारत आहे. शाळेच्या या इमारतीत पाच खोल्या व अंगणवाडीची एक खोली आहे. प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी शाळा इमारत समितीकडे १६ लाख ५६ हजार रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. मात्र याबाबतचा ठेका कोणाही ठेकेदाराने शाळा व्यवस्थापन समितीने अद्याप दिलेला नाही. तरीही  गावातीलच एका ठेकेदाराने मनमानीपणे या इमारतीचे छत उतरवून अंगणवाडीची इमारत दोन दिवसांपूर्वी जमीनदोस्त केली आहे. यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. 

प्राथमिक शाळा इमारत खोली निर्लेखित करण्याचे आदेश मिळण्यापूर्वीच कंत्राटदाराने हे कृत्य केले आहे. तसेच सोबत अंगणवाडीची इमारतही पाडली आहे. गतवर्षी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी खर्ची करण्यात आला असून इमारत निर्लेखित केल्यानंतर या इमारतीचे साहित्यही या सदर ठेकेदाराने लंपास केल्याची तक्रार आहे. अंगणवाडी इमारत बांधकामाचा कोणताही प्रस्ताव नसताना ही इमारत पाडण्यात आली आहे. याबाबतची माहिती गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देवूनही अद्याप पर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही. सदर प्रकरणी बालविकास अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना ही बाब कळवणे गरजेचे असताना त्यांनी केवळ ग्रामपंचायतीला याबाबत पत्र दिले आहे. 

अंगणवाडीची इमारत पाडून सदर ठेकेदाराने बेकायदेशीरपणे हे कृत्य केले आहे. सध्या शाळा बंद असल्यातरी ल़ॉकडाऊन संपल्यानंतर ऐन पावसाळ्यात शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. अशा वेळी गगनबावड्यासारख्या अतिपावसाच्या प्रदेशात मुलांना कुठे बसवायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोंधळेकर यांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत गटशिक्षणाधिकारी एस.पी. भांगरे यांचेशी संपर्क साधला असता याबाबतची तक्रार प्राप्त झाली असून या शाळेच्या काही खोल्या निर्लेखित केल्याचे समजते. याप्रकरणी चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश केंद्रप्रमुखाना देण्यात आल्याचेही भांगरे यांनी सांगितले.

यासंदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी मनिषा पालेकर यांच्याशी संपर्क साधला असता, सदर अंगणवाडीची इमारत ही विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य होती. मणदूर गावातील लोकांनी फोन करून सदर अंगणवाडीतील साहित्य गायब असल्याचे आम्हाला कळवले, त्यामुळे भेट दिली असता पूर्ण इमारतच गायब असल्याचे निदर्शनास आले. 
Team Lokshahi News