गगनबावडा | गगनबावडा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसापूर्वी आरोग्यविभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील दोन कोरोनाबाधितांमुळे ५० ते ६० जणांचे स्वॅब घेण्याची वेळ आली होती. आताही तसाच प्रकार घडला असून साळवण येथील मंडल अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
साळवण येथील मंडल अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल मंगळवारी (२८ जुलै) पाॅजिटीव्ह आला असून त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या मंडल अधिकाऱ्याच्या संपर्कात तालुक्यातील अनेक लोक आणि शासकीय कर्मचारी आल्याची चर्चा असून सध्या तरी प्रशासनाने हमखास संपर्कात आलेल्या १५ जणांना गगनबावडा येथील कोविड केअर सेंटर येथे क्वारंटाईन केले आहे. क्वारंटाईन केलेल्यांचेही स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
एकीकडे ज्या लोकांवर कोरोना नियंत्रणाची जबाबदारी आहे, अशांनाच कोरोनाची लागण होत असल्याने लोकांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरत आहे. यापूर्वी पोलीस ठाणे, वनविभाग तर आता महसूल अशा शासकिय कार्यालयातील अधिकारी कोरोनाबाधित निघाल्याने तालुक्यात चिंता वाढत आहे.