Categories: गुन्हे बातम्या

गगनबावडा : अवैध धंदे जोमात, पोलिस यंत्रणा कोमात

कोल्हापूर| जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात अवैध व्यवसाय जोमाने सुरू असून याला पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. बेकायदेशिर दारू, पेट्रोल, डिझेल विक्री, जुगार, मटका यासारख्या अवैध व्यवसायाकडे होणारे पोलिसांचे दुर्लक्ष हेच पोलिसांचा या अवैध व्यवसायाला पाठबळ असल्याचा पुरावा असल्याचे तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. 

गगनबावडा तालुक्याच्या सुरक्षिततेसाठी गगनबावडा येथे पोलिस ठाणे आणि साळवण येथे पोलिस चौकी कार्यरत आहे. यापूर्वी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अवैध व्यवसायांवर कारवाई होताच लगोलग तालुक्यातील अवैध व्यावसायिक काही काळापुरते तरी आपला अवैध व्यवसाय बंद करत होते. परंतु आताची परिस्थिती उलटी असून पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आणखी नवीन अवैध व्यावसायिक तयार होत आहेत. कारवाईनंतर अवैध व्यावसायिकांकडून वाढीव हप्ते घेतले जात असल्याचीही चर्चा सुरू आहे. तसेच नव्याने अवैध व्यवसाय सुरू करणारे देखील पोलिसांना मागेल तितका हप्ता देऊन यामध्ये पाऊल टाकत आहेत. यातुन अवैध व्यवसायिकांमध्ये देखील स्पर्धा लागल्याचे दिसत असून दिवसेंदिवस ही स्पर्धा आणखी वाढत असून नवनवीन अवैध व्यावसायिकांची भर पडत आहे.

कोल्हापूर – गगनबावडा महामार्गावरील गगनबावडा हद्दीतील छोट्या मोठ्या दुकानात, पानटपऱ्यात सर्रास अवैधरित्या पेट्रोल, डिझेल, दारूची विक्री केली जाते. अवैध दारू सहजासहजी उपलब्ध होत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. जोडीला मटका आणि जुगार याची देखील साथ असल्याने अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. परंतु या सर्व गोष्टींना पोलिसांचेच पाठबळ मिळत असल्याने अवैध व्यावसायिकांविरोधात तक्रार तरी कोणाकडे करायची असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. 

मागील महिन्यात महिला पोलिस अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी कारवाईचा फार्स केल्यानंतर अवैध व्यवसाय बंद होणे अपेक्षित होते मात्र तसे न होता नव्या जोमाने अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत. याकडे पोलिसांचे कोणत्या कारणाने दुर्लक्ष सुरू आहे, हे न समजण्याइतपत तालुकावासिय अज्ञानी नाहीत अशी भावना नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा तालुकावासियांच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

अवैध व्यवसायांचे हॉटस्पॉट –
गगनबावडा, असळज, साळवण, खोकुर्ले, शेणवडे, लोंघे, साखरी, तिसंगी, अंदूर, तसेच तालुक्यातील महामार्गाच्या आतील बहुतांशी गावे ही अवैध व्यवसायाची हॉटस्पॉट बनली आहेत. तालुक्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेही अवैध व्यवसायाला चालना मिळत आहे. शनिवार रविवारी येणारे पर्यटक बहुतांशी मौजमजा, पार्ट्या करण्यासाठी येत असल्याचे दिसून येते. अशा पर्यटकांची हौसमौज पुरवण्यासाठी देखील काही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येते. तसेच तालुक्यातील गगनबावडा, असळज, साळवण ही बाजारपेठांची ठिकाणे असल्याने याठिकाणी लोकांची असणारी वर्दळ देखील अवैध व्यवसायाला चालना देत आहे. परंतु या सर्व ठिकाणी चालणारे अवैध व्यवसाय पोलिसांच्या पाठबळामुळेच सुरू असल्याची तक्रार तालुकावासियांकडून केली जात आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: gaganbawada illgal trade