गगनबावडा | गगनबावडा तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडे साळवण बाजारपेठ येथे विनामास्क फिरणाऱ्या निवडेच्या उपसरपंचासह १५ जणांवर कारवाई केली आहे. तर साखरी आणि गगनबावडा येथील २५ जण अशी तालुक्यातील ४० जणांवर कारवाई केली आहे.
पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत राजकीय लोकांबरोबरच सर्वसामान्यांचाही समावेश आहे. एकीकडे तालुक्यात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादूर्भाव वाढतोय. याला नागरिकांचा बेजबाबदारपणाही तितकाच कारणीभूत असून सर्वांनी स्वतःच्या सुरक्षेबरोबर इतरांच्या सुरक्षेचेही भान ठेवून वावरणे गरजेचे असल्याचे मत, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता पाटील यांनी व्यक्त केलय. यापुढे कोरोनाच्या बाबतीत निष्काळजीपणा करून लोकांच्या आरोग्यास धोका पोहचवणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्याचा इशाराही यानिमित्ताने पाटील यांनी दिला आहे.
गगनबावडा तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे ८० रूग्ण आढळले असून ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या तालुक्याचे तहसिलदार देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले असून दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे तालुकावासियांनी स्वतःहून आपली जबाबदारी ओळखून सामाजिक आरोग्य जपणे गरजेचे आहे.