Categories: गुन्हे

गगनबावडा : साळवण येथे अवैध दारू अड्ड्यावर छापा; एकास अटक

गगनबावडा | गगनबावडा तालुक्यातील निवडे साळवण येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून एकास अटक केली आहे. यावेळी गगनबावडा पोलिसांनी ६,५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अमोल अरूण माने (वय ३५) यास ताब्यात घेतले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुप्त खबऱ्याव्दारे सहाय्यक पोलिस निरिक्षक संगिता पाटील यांना निवडे साळवण येथे विनापरवाना दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसानी अमोल माने याच्या घरी धाड टाकली असता विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला दारूचा साठा आढळून आला. सदर साठा जप्त करून पोलिसांनी अमोल माने यास ताब्यात घेतले आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या तालुक्यात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. असे असताना तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारू विक्री केली जात होती. याबाबत बऱ्याचवेळा स्थानिकांमधून अवैध व्यावसायिंकाबद्दल दबक्या आवाजात चर्चाही सुरू होती. आज झालेल्या कारवाईने स्थानिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशा स्वरूपाचे अवैध व्यवसाय सुरू असून त्यावरही पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी तालुकावासियांमधून होत आहे.

या कारवाईत सहाय्यक पोलिस निरिक्षक संगिता पाटील यांच्यासह पोलिस कॉ. संदीप घाटगे, शहाजी दुर्गुळे, संजय पोवार  यांनी सहभाग घेतला. आरोपीस सोमवारी (१४ स्पटेंबर) न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील तपास गगनबावडा पोलिस करीत आहेत. 

Team Lokshahi News