बेंगळूरू। ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मास्टरमाईंड ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. झारखंडमधील धनाबादमधून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीनं ही कारवाई केली असून आज धनबादमधील कोर्टात देवडीकरला हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर अधिक तपासासाठी त्याला बेंगळुरूत आणण्यात येणार आहे.
ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादमधील असून कतरासचे व्यावसायिक प्रदीप खेमका यांच्या पेट्रोल पंपावर खरी ओळख लपवून राहिला होता. तो धनबादमध्ये सध्या वास्तव्यास होता अशी माहिती एसआयटीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एसआयटीनं छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या घरात पोलिसांना काही महत्त्वाचे दस्तावेजही सापडले असल्याचं समजत आहे. याआधी अटक केलेल्या अमोल काळेचा हा साथीदार आहे. दरम्यान गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अमोल काळे हा पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा सिनियर प्लॅनर होता अशी माहिती कर्नाटक एसआयटीच्या सूत्रांनी २८ ऑगस्टला दिली होती. या तिन्ही हत्या एकाच पिस्तूलानं केल्याची माहिती अमोल काळेनं कर्नाटक एसआयटीला दिली होती. या पिस्तूलला सुदर्शन चक्र असं नावही दिलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी बेळगावच्या गणेशपूर भागात आणखी एका आरोपीला अटक केली होती. सागर लाखे असं या आरोपीचं नाव आहे.
पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी बेंगळुरू येथे त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. गौरी या ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका होत्या.