Categories: कृषी

टोळधाड आपत्तीसाठी तयार रहा…

कोल्हापूर। सध्या महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात टोळधाडीने शेतकऱ्यांच्या पीकांचं मोठं नुकसान सुरू केलय. पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्यप्रदेश मार्गे आलेल्या या टोळधाडींनी विदर्भातल्या नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात धडक दिली आहे. आता या टोळधाडीचा पश्चिम महाराष्ट्रालाही सामना करावा लागण्याची भिती व्यक्त होतेय. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी टोळधाड आपत्तीसाठी तयार रहाण्याचे आवाहन केलय. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी यावेळी जिल्ह्यात येवू घातलेल्या टोळधाडी विषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, टोळधाड दिवसा दिसत नाही. त्यासाठी रात्री दक्ष रहावे लागते. ही टोळधाड हिरव्या मोठ्या झाडांवर थवा करुन बसते. आस्का लाईटच्या माध्यमातून ही दिसते. अग्नीशामन दल तसेच ट्रॅक्टर माऊंटेड फवारणी यंत्राद्वारे यावर फवारणी करावी. त्यासाठी क्लोरोपायरीफॉसचा वापर करावा अशा सूचना दिल्यात. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

काय आहे ही टोळधाड – कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार

  • एका टोळधाडीत कोट्यवधी किटक असतात.
  • टोळधाडीचा शेतावर प्रादुर्भाव झाल्यास आगीचा मोठ्या प्रमाणात धूर करावा.
  • शेतात मोठा आवाज करावा. डीजे, ट्रॅक्टरचे सायलेंसर काढून त्याचा आवाज, याचा उपयोग करता येईल.
  • अनेकांनी एकत्र येऊन भांडी वाजवल्यानेही टोळ पळून जाण्यात मदत होईल.
  • टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1 लीटर पाण्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 50%, साईपरमेथ्रीन 5% हे रसायन 3-4 मिली एवढ्या प्रमाणात मिसळून फवारणी करता येईल.
  • टोळधाड खूप मोठी असल्याने फवारणीसाठी अग्निशमन दलाची गाडी किंवा ड्रोनचा वापर करावा.

पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्यप्रदेश मार्गे आलेल्या टोळधाडींनी विदर्भातल्या नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात धडक दिली आहे. या भागात संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचं या किटकांनी मोठं नुकसान केलं आहे. मध्यप्रदेशातून हे टोळ म्हणजेच नाकतोडे सातपुडाच्या पर्वतरांगांमधून नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात पोहोचले आहेत. नागपुरातले संत्रा उत्पादन तालुके असलेल्या काटोल आणि नरखेडमध्ये सोमवारपासून टोळधाड पडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

अमरावतीतल्या वरूड, मोर्शी आणि वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या पीक नसल्यामुळे हे किटक संत्र्यांच्या झाडांच्या पानांचा फडशा पाडत आहेत. सध्या पानगळीनंतर झाडांना नवी पालवी येत आहे. पण हे किटक कोट्यवधींच्या संख्येने आहेत आणि त्यामुळे नुकसान मोठं होतंय. हे किटक एखाद्या तालुक्यात पोहोचल्यानंतर रात्रीतून पाच ते सहा किमी परिसरातल्या झाडांचं नुकसान करतात. एखाद्या झाडावर हल्ला केल्यानंतर त्या झाडाच्या फांद्याच शिल्लक राहतात. पानं पूर्णपणे खाऊन टाकतात. सध्या विदर्भात पीक नाहीत. पण भाजीपाला आणि संत्रा, मोसंबी, लिंबू या झाडांच्या बागा उभ्या आहेत. त्यांना टोळांनी लक्ष्य केलं आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: टोळधाड शेती