नवी दिल्ली | आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय कामांसाठी आधार कार्डची गरज आता सर्वांच्या लक्षात आली आहे. परंतु आधारकार्डमधील चुका, किंवा काही दुरूस्त्या करायच्या असतील तर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. UIDAI ने प्रक्रिया आता सोपी केली असली तरी त्यासाठी आकारले जाणारे शुल्क मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचवणारे ठरणार आहे.
आधार कार्ड संदर्भात कोणतेही अपडेट करायचे असल्यास आता जादा शुल्क भरावे लागणार आहे. UIDAI ने यासंदर्भात काही दिवसांपुर्वीच माहिती दिली आहे. UIDAI आधार कार्डवरील मोबाईल नंबर, ई-मेल आयडी अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. यात आता आणखी एक बदल केला आहे. आधारवरील कोणत्याही अपडेटसाठी आता १०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती UIDAI ने ट्विटरवरुन दिली आहे. आधार कार्डवरील एक अपडेट करायची असेल किंवा अनेक, बायोमेट्रिक्ससाठी आपल्याला शंभर रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर फक्त डेमोग्राफिक डिटेल मध्ये बदल करत असाल तर आपल्याला ५० रुपये द्यावे लागतील.
#AadhaarUpdateChecklist
आपण खालील बाबी मर्यादित प्रमाणातच अपडेट करू शकता
१. नाव: वैध फोटो आयडी वापरुन दोनदा
२. लिंग: एकदा, कागदपत्रांची आवश्यकता नाही
३. जन्मतारीख: जन्मतारखेचा पुरावा
इतर कोणत्याही फील्डसाठी, आपण आवश्यकतेनुसार अनेक वेळा बदल करू शकता.
आधार कार्डसाठी लागणारी कागदपत्रे
UIDAI ने आधार अपडेट करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील याची माहिती दिली आहे. UIDAI ने सांगितले आहे की, आपल्या आधार मध्ये नाव, पत्ता, किंवा जन्म तारीख अपडेट करायचा असेल तर पुरविण्यात आलेली कागदपत्रांमध्ये आपले नाव, पत्ता, हे बरोबर आहे ना हे तपासून घेणे. दरम्यान UIDAI ने ३२ कागदपत्रांची यादी दिली आहे. हे ओळखीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यातील कोणतेही कागदपत्र अपडेटसाठी उपयोगात येऊ शकतील.
दरम्यान UIDAI ने याआधी सांगितले होते की, फोटोग्राफ, बायोमेट्रिक्स, लिंग, मोबाईल, नंबर, आणि ईमेल आयडीच्या अपडेटसाठी कोणतेही कागदपत्र लागणार नाही. यासाठी आपण आपल्या जवळील आधार केंद्रावर जावे लागेल, त्यासाठी आपण भेटीची वेळ ठरवून घेऊ शकता.