मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या महापारेषण वीज कंपनीत जवळपास ८५०० तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज दिलेत. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने हजारों तरुणांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
राज्यात वीज पारेषण कंपनीतील तांत्रिक श्रेणीतील ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील ६७५० पदे व अभियंता संवर्गातील १७६२ पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत असल्याने बेकारीचे संकट झेलणाऱ्या हजारो तरुणांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. मंत्री डॉ राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला आहे.
आज मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नव्या मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश देखील उर्जामंत्र्यांनी यावेळी दिलेत.
यंत्रचालक, तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण –
यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी घेतला आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठित अवस्था या मेगा भरतीमुळे संपुष्टात येणार असल्याने महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.