Categories: Featured कृषी

शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी…

सांगली। महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या मागे असणारी सातबाराची कटकट आता मिटवणार आहे. शेतकऱ्यांची सातबाराविना वेळेत न होणारी कामं आणि सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी पळापळ यातून सुटका होणार आहे. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे, ते कार्यालयच संबंधित शेतकऱ्याचा सातबारा हा ऑनलाईन उपलब्ध करुन घेणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

याबाबतचे शासकीय परिपत्रक लवकरच निघणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगलीतील कडेगावमध्ये बोलताना ही माहिती दिली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा आता ऑनलाईन उपलब्ध करुन दिला जाणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा आणि खाते उतारा ऑनलाईनचं काम मागील काही काळापासून सुरु होतं. सध्या हे काम जवळपास पूर्ण व्हायला आलं आहे. याबाबतचं परिपत्रक निघाल्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सातबारा घेऊन फिरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे ते कार्यालय संबंधित शेतकऱ्याचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करुन घेईल. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्या शेतकऱ्याचा सातबारा उतारा ‘डाऊनलोड’ करुन घेता येईल.

शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सातबारा घेऊन फिरण्याची गरज नाही. यामुळे सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा वाया जाणारा वेळ आणि सातबारा नसल्याने शेतकऱ्यांची अडणारी कामं या दोन्ही गोष्टींवर या ऑनलाईन सातबारा उपलब्ध करुन दिल्याने तोडगा निघणार आहे.

Team Lokshahi News