मुंबई | अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून सुधारित गुणांच्या अटीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.
सामंत म्हणाले की, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीला विज्ञान शाखेतील (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) विषयांना ५० टक्के गुण मिळणे आणि प्रवेश पात्रता परिक्षा (सीईटी) देणे गरजेचे होते. परंतु आता सुधारित अटीनुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला ४५ टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत. तर राखीव गटासाठी ४० टक्के गुण गरजेचे आहेत.
यामुळे अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येऊन गुणांची टक्केवारी ५ टक्क्यांनी कमी झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.