Categories: आरोग्य सामाजिक

Good News : कोल्हापूरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, जिल्ह्यात फक्त ‘इतके’च रूग्ण!

कोल्हापूर | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य यंत्रणांसह जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. कोरोना रूग्ण आढळल्यानंतर राबवली जाणारी प्रभावी उपाययोजना आणि रूग्णावरील उपचार पध्दती यामुळे जिल्ह्यातील एकूण ७३४ रुग्णांपैकी ६७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  त्यामुळे सध्या केवळ ५० अॅक्टिव्ह रूग्ण कोल्हापूरात असून त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येईल असा विश्वास प्रशासनाला वाटू लागलाय.  

याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिलीय. आज एक अहवाल प्राप्त झाला असून तोही निगेटिव्ह आला आहे. सध्या बाहेरून प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेही ही संख्या आटोक्यात आणण्यास मदत झालीय. 

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आजरा – 76, भुदरगड – 73, चंदगड – 75, गडहिंग्लज – 86, गगनबावडा – 6, हातकणंगले – 11, कागल – 57, करवीर – 21, पन्हाळा – 27, राधानगरी – 68, शाहुवाडी – 180, शिरोळ – 8, नगरपरिषद क्षेत्र – 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र -26 असे एकूण 725 आणि पुणे -1, सोलापूर -3, मुंबई – 2, कर्नाटक -2 आणि आंध्रप्रदेश -1 असे इतर जिल्हा व राज्यातील 9 असे मिळून एकूण 734 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात नोंद आहे. यातील 734 रूग्णांपैकी 676 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल असलेल्या रूग्णांची संख्या 50 इतकी उरली आहे.

पुण्यातून आलेल्या एका तरूणाच्या रूपाने कोल्हापूरात कोरोनाचा शिरकाव झाला होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर पुढील दीड महिने आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेत करोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळवले होते. परंतु बाहेरील जिल्ह्यात अडकलेले मुळचे कोल्हापूरकर पुणे, मुंबईसह रोडझोनमधून कोल्हापूरात आल्याने कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यातील आकडा झपाट्याने वाढला. एका एका दिवसाला ५०-५० रूग्णही आढळू लागले. त्यामुळे रुग्णांची संख्याही ७०० च्या वर पोहचली. मात्र, रुग्णांवर तातडीने होणारे उपचार, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण, कंटेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी आणि जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींची सातत्याने तपासणी सुरू ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवणे अखेर शक्य झाले आहे.

Team Lokshahi News