Categories: कृषी

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीः शेतकरी कर्जमाफीचे पैसे झाले जमा

मुंबई। राज्यातील जवळपास १९ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ३१ मार्चअखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. याचा राज्यातील थेट १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर नव्याने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याचीच अंमलबजावणी सध्या होत आहे.

जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख रुपये जमा करण्यात आले. तसेच व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या मात्र सरकारने सांगितल्याप्रमाणे वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

Rajendra Hankare