गुगल डूडल वर झळकलेली ‘ही’ भारतीय होती, स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिली महिला आमदार

208
googel doodel

गुगलने ३० जुलै २०१९ रोजी एका भारतीय महिलेचे खास डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली. डॉ. मुथूलक्ष्मी रेड्डी असे या खास महिलेचे नाव असून त्या भारतातल्या पहिल्या महिला विधिमंडळ सदस्या म्हणजेच आमदार होत्या. त्यांच्या या विशेष कामगिरीची दखल घेऊनच गुगलने त्यांच्यासाठी खास डूडल बनवले, ज्यामुळे त्यांची प्रेरणा सर्व भारतीय महिलांना मिळेल. 

सध्या भारतीय राजकारणात अनेक महिला सक्रियपणे आपली भुमिका पार पाडताना दिसत आहेत. सरपंच, आमदार, खासदार ते राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा सर्वच महत्वाच्या राजकीय पदांवर भारतीय महिलांनी आपला ठसा उमठवला आहे. पण, महिलांच्या या लोकशाहीच्या सभागृहातल्या राजकारणाची नेमकी सुरवात कोणत्या महिलेने केली हे मात्र आपल्यातील अनेकांना माहित नाही. या होत्या मद्रास प्रांतातील पुडुकोट्टाई संस्थानात जन्म झालेल्या डॉ. मुथूलक्ष्मी रेड्डी.

डॉ. मुथूलक्ष्मी रेड्डी यांचा जन्म ३० जुलै १८८६ साली तेव्हाच्या मद्रास प्रांतातील पुडुकोट्टाई संस्थानात झाला. वडील नारायण स्वामी हे चेन्नईच्या महाराजा कॉलेजचे प्राचार्य होते. तो केवळ पुरुषांनीच शिक्षण घ्यायचा काळ. महिलांचं जीवन केवळ चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित. स्त्रिया या पुरुषांच्या सामाजिक गुलामीत जखडलेल्या आणि शोषणाने पिचलेल्या. समाजाने तर स्त्रियांना बारीक सारीक हक्कसुद्धा नाकारले होते. मग स्त्री- शिक्षण तर दूरचीच गोष्ट. अशा परिस्थितीत मुथूलक्ष्मींनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर शिक्षणाची आवड आणि बंडखोर स्वभावामुळे पुढचं शिक्षण घ्यायचं ठरलं. त्यांची आई त्यांच्या या निर्णयाच्या मागे ठामपणे उभी राहिली.

मुथूलक्ष्मीनी बंढखोरी करत चेन्नईच्या महाराजा कॉलेजमधे प्रवेश घेतला. पुरुषांच्या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. महाराजा कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. तो अभ्यासक्रम पूर्ण करताना, त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. मेडिकलचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्या मद्रासच्या शासकीय मातृत्व आणि नेत्र रुग्णालयातल्या पहिल्या महिला शल्यविशारद म्हणजेच सर्जन बनल्या.

आपल्या डॉक्टरी पेशाचे काम करीत असताना मुथूलक्ष्मींचा संपर्क सरोजीनी नायडूशी यांच्याशी झाला. सरोजिनींच्या कार्यामुळे मुथूलक्ष्मीदेखील महिलांच्या प्रश्नांसंबंधित बैठकांना हजेरी लावू लागल्या. पुढे त्यांची भेट अ‍ॅनी बेझंट आणि महात्मा गांधी यांच्याशी झाली.  या भेटीनंतर मात्र त्यांच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं. त्यानंतर गांधींजींच्या इच्छेनुसार त्यांनी महिलांच्या हक्कासंबंधी कार्य करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं.

महिलांच्या हक्कासंबंधी कार्य करत असताना, मुथूलक्ष्मी यांना इंग्लंडमधे उच्च शिक्षणाची संधी मिळाली होती. पण ही संधी नाकारत त्यांनी स्वतःच थापन केलेल्या ‘वुमेन्स इंडिया असोसिएशन’च्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. आणि १९२६ ला त्या मद्रास विधिमंडळाच्या सदस्या देखील बनल्या. अशारितीने पहिल्या महिला विधिमंडळ सदस्या बनणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या. त्यांच्या या कामगिरीमुळेच यांची मद्रास विधिमंडळाची पहिली महिला उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. केवळ भारतातल्याच नाही तर जगातील सर्वच विधिमंडळाच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा म्हणून त्यांचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं.

विधिमंडळाचं काम करत असताना महिलांच्या हक्कांसंबंधी त्यांनी हिरीरीने आवाज उठवला. मद्रास प्रांतात त्यांनी देवदासी प्रतिबंध बिल पास करवून घेतलं. लग्नासाठी मुलीचं किमान वय सोळा असावं यासाठी विशेष प्रयत्न केला. त्यांनी महिला आणि बालकांच्या अवैध व्यापाराविरोधी बिल पास करवून घेतलं. आणि वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ओढलेल्या अनेक महिलांना मुक्त केलं. मुस्लिम मुलींसाठी वसतिगृह, दलित मुलींसाठी शिष्यवृत्तीही उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या कार्याची माहिती त्यांनी आपल्या ‘माय एक्सपिरीअंस अॅज अ लैजिस्लेटर’ या पुस्तकात लिहिली आहे.

डॉ. मुथूलक्ष्मी रेड्डी यांनी गांधीवाद प्रमाण मानून स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांच्या विरोधात भाग घेतला. समाजसुधारणेमधेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. भारतीय शिक्षण व्यवस्थेमधे अमुलाग्र बदल घडवणाऱ्या १९२९ मधल्या हर्टोग समितीच्या कामकाजात त्यांचं बहुमूल्य योगदान होतं. १९३१ साली त्यांनी अड्यार इथे ‘अव्वाई होम’ची स्थापना केली. या माध्यमातून अनाथ मुली आणि निराधार महिलांना त्यांचा धर्म, जात, सामाजिक स्तर न विचारात घेता आश्रय दिला. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी करून प्रतिष्ठेसह जीवन जगण्यासाठी मदत केली.

रेड्डी यांनी ‘ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स’ची स्थापना केली. रोशनी या मुखपत्राच्या त्या संपादिका होत्या, या माध्यमातून त्यांनी महिलांच्या हक्कांसंबधी विपुल लेखन केलं. त्यांनी कॅन्सर रिलीफ फंडची स्थापना केली. १९५२ साली त्यांनी अड्यार कॅन्सर संस्था स्थापना केली. त्याकाळी अशा प्रकारची कॅन्सरसंबंधी काम करणारी ती देशातील केवळ दुसरी संस्था होती. या संस्थेचं रूपांतर आज एका वटवृक्षात झाले आहे.

डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी या भारतातल्या पहिल्या विधिमंडळ महिला सदस्य झाल्या. हे भारतीय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधे स्त्री समनातेकडे पडलेलं उल्लेखनीय पाऊल होतं. त्यांच्या या जीवनकार्याची दखल घेऊन १९५६ साली त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९६८ ला त्या ८१ वर्षाच्या असताना त्यांचा मृत्यू झाला. 

मुथूलक्ष्मी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या हक्कांसाठी समर्पित केलं. आणि भारतीय समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांनी समाजसुधारक, स्त्रीवादी कार्यकर्त्या, लेखिका, यशस्वी राजकारणी अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या. आज डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या जयंतनिमित्त गुगलने डुडल करून त्यांना मानवंदना दिलीय. तर डॉ. रेड्डींनी आरोग्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल तमिळनाडु सरकार हा दिवस हॉस्पिटल दिन म्हणूनही साजरा करते. अशा या महान भारतीय महिलेचा १९६८ ला वयाच्या ८१ व्या वर्षी मृत्यू झाला. 

  • संदर्भ – कोलाज.इन वेबपोर्टल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here