Categories: कृषी

केंद्रसरकारची कांदा उत्पादकांसाठी खूशखबर!

नवी दिल्ली। दरवाढीमुळे गेल्या चार महिन्यापूर्वी कांद्यावर लागू करण्यात आलेली निर्यात बंदी अखेर केंद्र सरकारने रद्द केली आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी याची माहिती ट्वीट केली आहे. यंदाचे बंपर उत्पादन आणि स्थिर बाजारभावामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये दिली आहे. कांदा निर्यात बंदी उठविली असली तरी किमान निर्यात मुल्याबाबत मात्र पासवान यांनी स्पष्टता केलेली नाही. गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या २८.४ लाख टन तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात जवळपास ४० लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे. 

केंद्र सरकारने १३ सप्टेंबर २०१९ मध्ये कांद्यावरील निर्यात मुल्य ८५० डॉलर केले होते. त्यानंतर २९ सप्टेंबर २०१९ला कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्यातबंदी लागू केली. जानेवारी २०२०पासून कांदा दरात मोठी घसरण होऊनही निर्यातबंदी उठविण्यात आली नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलनेही केली. शेतकऱ्यांनी शिष्टमंडळांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांच्याही याबाबत भेटी घेतल्या. राज्य सरकारच्यावतीने सुद्धा केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आले. यासर्व प्रयत्नानंतर अखेर केंद्र सरकारकडून नुकतीच एक समिती कांदा दर आणि आवकेचा आढावा घेण्यासाठी बाजारसमित्यांना भेट देऊन गेली. या समितीने दिलेल्या अहवालानंतर केंद्र सरकारने अखेर निर्यात बंदी उठविल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने कांदा उत्पादनाचा अंदाज आल्यानंतर विविध देशांबरोबर केलेले कांदा आयातीचे करार रद्द केले होते. केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. 

Rajendra Hankare