Categories: कृषी

महाराष्ट्र सरकारने शेळीपालनासाठी सुरू केली ‘गोट बॅंक’ योजना; जाणून घ्या काय आहे ‘ही’ संकल्पना आणि याचे फायदे!

मुंबई | शेळीला गरीबांची गाय म्हणटले जात असून ग्रामीण भागातील अनेक कुटूंबे शेळीपालनातून आपला उदरनिर्वाह करतात. कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा शेळीपालन हा चांगला व्यवसाय असून कमीत कमी जागेत आणि कमी मजुरांच्या मदतीने करता येतो. शेळीपालनातून उत्पन्न देखील चांगले मिळत असल्याने डोंगराळ भागातील अदिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी शेळीपालनाला विशेष प्राधान्य देतात. हीच बाब ध्यानात घेत शासनाने जास्तीत शेतकरी महिलावर्गाला यातून रोजगार मिळावा या उद्देशाने ‘गोट बँक’ हा उपक्रम सुरू केला आहे. 

शासनाने  गोट बँक हा उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमच्या माध्यमातून सुरू केला आहे. सध्या प्रायोगिक स्तरावर हा उपक्रम अकोला आणि अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ‘गोट बँक’ उपक्रमासाठी राज्य शासनाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि कारखेडा कृषी उत्पादक कंपनी, अकोला यांच्यामध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. याची सुरवात करताना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाभार्थी महिलांशी संवाद साधला.

दरम्यान माविमच्यावतीने सुरू करण्यात येत असलेला गोट बँकेचा उपक्रम अतिगरीब महिलांच्या आर्थिक  सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल. शेळीपालनातून होणाऱ्या कमाईतून चलन फिरते.  या व्यवसायामुळे चलन फिरते राहिल्यामुळे  उपजीविकेला हातभार लागण्यासह जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. 

यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, ग्रामीण महिलांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यास कुटुंबाचे जीवनमानही उंचावले जाते. याच उद्देशाने महिलांसाठी विशेष उपजीविका प्रकल्प राबविण्यात येत आहे. माविमअंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) तसेच सामूहिक उपयोगिता केंद्र (सीएफसी) त्यासाठी काम करत आहेत.  

काय आहे गोट बॅंक संकल्पना?

  • गोट बँक उपक्रमांतर्गत माविमच्या महिला बचत गट सदस्यांना नाममात्र प्रक्रिया शुल्क आकारून प्रत्येकी एक शेळी वितरित करण्यात येणार आहे.
  • या शेळीच्या पहिल्या चार वेतातून ४ पिल्ले गोट बँकेला परत केल्यानंतर ही शेळी पुर्णतः संबंधित महिलेच्या मालकीची होणार आहे.
  • गोट बॅंकेकडे आलेली पिल्ले पुढे दुसऱ्या महिला सदस्यांना देखील अशाच पध्दतीने देऊन त्यांचे संगोपन केले जाणार आहे.
  • शेळ्या १ पेक्षा अधिक पिल्ले देत असल्याने त्यांच्या उर्वरित पिलांचे संगोपन करून त्यातून मिळणारा नफा हा लाभार्थी महिलांना घेता येणार आहे.
  • ग्रामीण भागात आर्धलिन पध्दतीने शेळ्या, कोंबड्या, दुभती जनावरे यांचे संगोपन केले जायचे काहीशा त्याच तत्वावर ही योजना राबवली जात आहे.
  • अकोला, अमरावती येथे राबविला जाणारा हा उपक्रम या दोन जिल्ह्यातील यशस्वीतेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला जाईल.

या कार्यक्रमात ऑनलाईन वरून राज्यमंत्री बच्चू कडू, मंत्रालयातून मंत्री अॅड. ठाकूर यांच्यासह महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, कारखेडा कृषी उत्पादक कंपनीचे संचालक नरेश देशमुख उपस्थित होते.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Bakri farm Berari goat Buying goats Fodder management for goats Goat Bank scheme Goat bank scheme Maharashtra Govt. Goat breeding Goat farm contact number Goat farm government subsidy goat farm project goat farm subsidy Goat farming Goat weight Konkan Kanyal Goat Osmanabad Goat Information उस्मानाबाद शेळी माहिती करडांचे वजन कोकण कन्याळ शेळी गोट बॅंक योजना महाराष्ट्र सरकार बेरारी शेळी शेळी प्रजनन शेळीपालन योजना शेळ्यांसाठी चारा व्यवस्थापन