Categories: प्रशासकीय

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द

गंगटोकमहाराष्ट्र सरकारच्या आधीपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करणाऱ्या सिक्कीम सरकारने हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. अवघ्या वर्षभरातच हा निर्णय रद्द करण्याची वेळ मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांच्या सरकारवर आलीय. पाच दिवसांचा आठवडा करूनही सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर सिक्कीम सरकारने हा निर्णय रद्द केला आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी घेतलेला निर्णय तमंग सरकारने मागे घेतला. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच सुट्टी देण्यात येईल.

महाराष्ट्रातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत केला होता. त्यानुसार २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी गेली अनेक वर्षे सरकारी कर्मचारी करत होते. परंतु महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील सिक्किममधील कर्मचाऱ्याप्रमाणे कामगिरी केली तर ठाकरे सरकारही घेतलेला निर्णय मागे घेईल अशी चर्चा आता सूरू झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून सूरू असलेलं पाट्या टाकण्याचे काम बंद होणं गरजेचे असल्याचे मतही व्यक्त होऊ लागलंय.

‘सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा’ सत्तेत आल्यानंतर सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अन्य सरकारी आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. आठवड्याला फक्त पाचच दिवस काम करावं लागत असूनही कर्मचारी कुचराई करत असल्याचं वर्षभरातच तमंग सरकारला जाणवलं, त्यामुळे तातडीने हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. येत्या एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची झोप उडाली असून कामात केली जाणारी दिरंगाई अंगलट आली आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Government employee 5 days week पाच दिवस आठवडा सरकारी कर्मचारी पाच दिवस आठवडा