Categories: राजकीय

जनतेमधूनच सरपंच निवड, ५२६ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई। अमरावती जिल्हयात एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ५२६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  सोमवारी (ता.२४) निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होताच या ग्रामपंचायतींच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल लागेपर्यंत ती कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. गुरुवारी (ता.२७) तहसीलदारांकडून निवडणूकीची नोटीस प्रसिध्द होईल. त्यानंतर ६ ते १३ मार्च या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. १६ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल तर १८ मार्च रोजी चिन्ह वाटप तर २९ मार्च रोजी मतदान व ३० मार्चला मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदार यादीचा कार्यक्रम सर्व ग्रामपंचायतींमध्ये ५ फेब्रुवारीपासून राबविण्यात आला आहे. २४ फेब्रुवारीला अंतिम यादी जाहीर करण्यात आलीय.

भाजप सरकारच्या काळात जनतेमधून सरपंच निवडीचा निर्णय घेण्यात आला होता. महाविकास आघाडीने हा निर्णय मागे घेत पूर्वी प्रमाणे सदस्यांमधून सरपंच निवडण्याचे घोषित केले. परंतू राज्यपालांनी अध्यादेशावर सही केली नाही, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. राज्यपालांनी मंजूरी न दिल्याने यावेळी सरपंचाची निवड नेमकी कोणत्या पध्दतीने होते याविषयीची उत्सुकता वाढीस लागली होती. निवडणूक आयोगाने मात्र १३ ऑगस्टच्या शासन अधिसूचनेनुसारच जनतेमधूनच सरपंच निवडला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला आता विधिमंडळात विधेयक आणूनच याविषयी कायदा करावा लागणार आहे. परिणामी सध्या तरी फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका आणि सरपंच निवड होणार आहे. 

तालुकानिहाय ग्रामपंचायती

 • अमरावती – ४६
 • तिवसा – २७
 • भातकुली -३४
 • चांदूररेल्वे – २८
 • धामणगाव – ५३
 • नांदगाव खंडेश्‍वर -४४
 • दर्यापूर – ४८
 • धारणी – ३२
 • चिखलदरा -१७
 • चांदूरबाजार -४१
 • अचलपूर – ४२
 • मोर्शी -३९
 • वरुड- ४१
 • अंजनगाव – ३४
 • एकूण -५२६
Team Lokshahi News